टोकेबाज न्युज वार्ता : रवि घुमे
मारेगाव. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीच्या पर्वावर २ ऑक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियानास सुरुवात केली.या अभियानाचे उद्दिष्ट असे की,शहरापासून ते गावखेडया पर्यंत स्वच्छते बद्धल जागरूकता निर्माण करणे, यामध्ये उघड्यावर शौचास नं जाणे, स्वतःची शारीरिक स्वछता,घनकचरा निर्मूलन, घरातील कचराअसताव्यस्त नं फेकता तो साठवून कचरा गाडीत टाकणे, ज्यामुळे परिसर स्वच्छ राहील जेणेकरून आरोग्यविषयक तक्रारी दूर होऊन निरोगी आयुष्य जगता येइल.स्वच्छ भारत अभियान हे देशव्यापी अभियान असून त्याचाच एक भाग म्हणून दीर्घ काळानंतर मारेगाव ला स्थायी स्वरूपात लाभलेले कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांनी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान राबवण्याबाबत शासनाचे निर्देशानुसार दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता या अभियानाचा प्रारंभ नगरपंचायत सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमात मुख्याधिकारी यांनी स्वच्छता ही सेवा पंधरवाड्याचे नियोजन व त्या अंतर्गत नियोजित विविध उपक्रमांची माहिती सांगितली. ह्या पंधरवाड्यात आरोग्य शिबीर, स्वच्छता रॅली, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा असे विविध उपक्रम नगरपंचायतद्वारे घेण्यात येणार आहेत.
दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता एक दिवस, एक तास, एक साथ ह्या घोषवाक्यासह सामूहिक स्वच्छता मोहीम आयोजित केली आहे. कार्यक्रमात सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की होते. उपाध्यक्षा हर्षा महाकुलकर, मारेगाव तहसीलचे नायब तहसीलदार महेश रामगुंडे, मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शाम वानखेडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते. तसेच नगरपंचायतचे मुख्याधिकारी शशिकांत बाबर (मशप्रसे), नगरसेवक हेमंत नरांजे नगरसेविका अंजुम शेख, नगरसेविका छाया किनाके यांची उपास्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर निरीक्षक राधिका देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन आस्थापना प्रमुख कविता किनाके यांनी केले.
“जनसहभाग अत्यंत महत्वाचा“
“स्वच्छता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे मी सर्व शहरवासियांना आवाहन करतो की आपण ह्या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा व अभियान यशस्वी करावे. हे अभियान लोकचळवळ होईल, अशी मी आशा व्यक्त करतो.
–शशिकांत मा. बाबर (मशप्रसे) मुख्याधिकारी गट-अ, न. पं. मारेगाव.













