दिग्रस येथे भूमी अभिलेख कार्यालयात ACB ची धाड “ उपअधीक्षक व भूमापक रंगेहात अटक “

February 3, 2026

वणी :यवतमाळ | दि. 3 फेब्रुवारी 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दिग्रस येथील भूमीअभिलेख कार्यालयात यशस्वी सापळा रचत दोन लाचखोर लोकसेवकांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेअसून महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

या कारवाईत सखाराम नरसिंग पवार (वय 49), उपअधीक्षक, भूमीअभिलेख कार्यालय, दिग्रस आणि आशिष काशिनाथ शेलोकर (वय 47), नझुल परिरक्षण भूमापक यांना अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार महिलेच्या सासऱ्यांनी त्यांच्या मालकीची मालमत्ता बक्षीसपत्राद्वारे तक्रारदार व त्यांच्या पतीच्या नावे केली होती. या मालमत्तेचा फेरफार नोंद करून मिळवण्यासाठी तक्रारदारांनी संबंधित कागदपत्रे भूमीअभिलेख कार्यालयात सादर केली. त्यावेळी भूमापक आशिष शेलोकर यांनी तक्रारदारांना उपअधीक्षक सखाराम पवार यांची भेट घेण्यास सांगितले असता त्याना भेटले असता 5 हजार रू.मागणी केली होती.

त्यानी फेरफार करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याची तक्रार ACB कडे करण्यात आली. पडताळणीत शेलोकर यांनी स्वतःसाठी व उपअधीक्षकांसाठी ही रक्कम मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ३ फेब्रुवारी रोजी सापळा रचण्यात आला. तक्रारदारांकडून शेलोकर यांनी पंचांसमक्ष ५ हजार रुपये स्वीकारले. त्यापैकी २,५०० रुपये स्वतःकडे ठेवून उर्वरित २,५०० रुपये पवार यांना देताच दोघांनाही उपअधीक्षकांच्या कक्षात रंगेहात पकडण्यात आले.

या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई अॅन्टी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचींद्र शिंदे आणि पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओरके व अर्जुन घनवट तसेच त्यांच्या पथकाने पार पाडली.

दरम्यान, शासकीय कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक ०७२३२-२४४००२, मोबाईल ८९७५७९१०६४ किंवा टोल फ्री १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.