मुकुटबन – पाटण सर्कल मध्ये “कुणबी फॅक्टर” निर्णायक

झरी : न्यायालयाच्या आदेशाने सुमारे तीन वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. “मिनी मंत्रालय” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा मार्ग आता सुकर झाला असून, दिवाळीनंतर कधीही निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर वणी विधानसभा क्षेत्रातील “हाय व्होलटेज” जिल्हा परिषद सर्कल असलेल्या मुकुटबन -पाटण सर्कल हे सर्वसाधारणसाठी राखीव असल्याने, प्रत्येक पक्षाकडे ईच्छुकांची नेत्यांकडे मांदियाळी सुरु झाली आहे. परंतु मुकुटबन – पाटण सर्कल मध्ये कुणबी मतदार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या सर्कलमध्ये “कुणबी फॅक्टर” निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे त्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शिक्षक सुनिल ढाले यांचे नाव कॉंग्रेस तर्फे आघाडीवर घेण्यात येत आहे. मुकुटबन-पाटण सर्कल मध्ये शिक्षक सुनिल ढाले यांनी अनेक आंदोलन, सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिर तसेच अनेक उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदविला आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील झरी-जामणी तालुका प्रत्येक निवडणुकीत निर्णायक भुमिका बजावत असतो. त्यामुळे प्रत्येक पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नजर झरी तालुक्यावर केंत्रित असते. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुका म्हणुन सुपरिचित असलेला, झरी तालुक्यातील मुकुटबन – पाटण सर्कलमध्ये “कुणबी फॅक्टर” निर्णायक भुमिका वठविणार आहे. यामध्ये कॉंग्रेसचे सदैव वर्चस्व राहीले असुन,या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते,सुनिल ढाले सर यांचे नाव नागरिकांमधुन चर्चेमध्ये येत आहे. शिक्षक सुनिल ढाले यांचा मोठा जनसंपर्क व मित्र परिवार आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडुन शिक्षक सुनिल ढाले यांना उमेदवारी देण्याची चर्चा होत आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही ‘दंडार’ लोकनृत्याची मोहिनी कायम

झरी-जामणी : माहिती तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढणाऱ्या युगात मोबाईल आणि इंटरनेटने प्रत्येक घरात पाय रोवले आहेत. मनोरंजनाची साधने घराघरात पोहोचली असली तरी आदिवासी संस्कृतीचा अभिमान असलेले आणि समाजजोडणीचे प्रतीक ठरलेले ‘दंडार’ लोकनृत्य आजही आपल्या तेजाने झळकत आहे.विजयादशमीदिनी समाजप्रमुख म्हणजेच महाजनांच्या घरी बैठक घेऊन दंडार बसविण्याचा निर्णय घेतला जातो. दसरा ते दिवाळी या काळात दररोज सायंकाळी महाजनांच्या दरबारी या लोकनृत्याची तालीम घेतली जाते.या तालमींमध्ये ढोल,ढोलकं, तुडमुडी,पेपरी सैनी,बासरी, मृदंग, डफ, घुंगरू, टाळ यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात कलाकार रंगतात. सुमारे २० ते २५ कलाकार नृत्यात भाग घेतात. या सरावाच्या माध्यमातून समाजातील किरकोळ वाद, रुसवे-फुगवे विसरले जातात आणि एकतेचे सुंदर वातावरण निर्माण होते.कलाकार मंडळी आपल्या कलागुणांची देवाणघेवाण करत आजूबाजूच्या गावांमध्ये पाहुणे बनून कार्यक्रम सादर करतात. समाजजोडणी, मनोरंजन आणि प्रबोधनाचा संगम या दंडारमधून साधला जातो. दिवाळीनंतर जमा झालेल्या मिळकतीतून गावात स्नेहभोजन घेऊन या उपक्रमाचा समारोप केला जातो.शहरांमध्ये नोकरी, व्यवसाय वा शिक्षणासाठी गेलेले आदिवासी बांधव दिवाळीनिमित्त गावात परतल्यावर दंडारच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घेतात. त्यांच्या पुढच्या पिढीलाही परंपरेची गोड झलक मिळते. म्हणूनच या लोकनृत्याची लोकप्रियता आजही तशीच जोमदार टिकून आहे.“दंडार हे केवळ लोकनृत्य नाही, तर आदिवासी समाजाच्या एकतेचे, संस्कृतीचे आणि आत्मीयतेचे सशक्त प्रतीक आहे,” असे मत संतोष तुमराम (घाट्या), मनोहर मेश्राम (महाजन), अरविंद नैताम (कारभारी), धर्मा गेडाम (भूमक), योगेश मडावी पत्रकार बाबुलाल किनाके,राजू गेडाम, विलास किनाके,आणि संज्जन कोडापे यांनी व्यक्त केले.