माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही ‘दंडार’ लोकनृत्याची मोहिनी कायम

October 24, 2025

झरी-जामणी : माहिती तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढणाऱ्या युगात मोबाईल आणि इंटरनेटने प्रत्येक घरात पाय रोवले आहेत. मनोरंजनाची साधने घराघरात पोहोचली असली तरी आदिवासी संस्कृतीचा अभिमान असलेले आणि समाजजोडणीचे प्रतीक ठरलेले ‘दंडार’ लोकनृत्य आजही आपल्या तेजाने झळकत आहे.विजयादशमीदिनी समाजप्रमुख म्हणजेच महाजनांच्या घरी बैठक घेऊन दंडार बसविण्याचा निर्णय घेतला जातो. दसरा ते दिवाळी या काळात दररोज सायंकाळी महाजनांच्या दरबारी या लोकनृत्याची तालीम घेतली जाते.या तालमींमध्ये ढोल,ढोलकं, तुडमुडी,पेपरी सैनी,बासरी, मृदंग, डफ, घुंगरू, टाळ यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात कलाकार रंगतात. सुमारे २० ते २५ कलाकार नृत्यात भाग घेतात. या सरावाच्या माध्यमातून समाजातील किरकोळ वाद, रुसवे-फुगवे विसरले जातात आणि एकतेचे सुंदर वातावरण निर्माण होते.कलाकार मंडळी आपल्या कलागुणांची देवाणघेवाण करत आजूबाजूच्या गावांमध्ये पाहुणे बनून कार्यक्रम सादर करतात. समाजजोडणी, मनोरंजन आणि प्रबोधनाचा संगम या दंडारमधून साधला जातो. दिवाळीनंतर जमा झालेल्या मिळकतीतून गावात स्नेहभोजन घेऊन या उपक्रमाचा समारोप केला जातो.शहरांमध्ये नोकरी, व्यवसाय वा शिक्षणासाठी गेलेले आदिवासी बांधव दिवाळीनिमित्त गावात परतल्यावर दंडारच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घेतात. त्यांच्या पुढच्या पिढीलाही परंपरेची गोड झलक मिळते. म्हणूनच या लोकनृत्याची लोकप्रियता आजही तशीच जोमदार टिकून आहे.“दंडार हे केवळ लोकनृत्य नाही, तर आदिवासी समाजाच्या एकतेचे, संस्कृतीचे आणि आत्मीयतेचे सशक्त प्रतीक आहे,” असे मत संतोष तुमराम (घाट्या), मनोहर मेश्राम (महाजन), अरविंद नैताम (कारभारी), धर्मा गेडाम (भूमक), योगेश मडावी पत्रकार बाबुलाल किनाके,राजू गेडाम, विलास किनाके,आणि संज्जन कोडापे यांनी व्यक्त केले.