पिकाचे नुकसान पाहून शेतकऱ्याची आत्महत्या

मारेगाव : नापिकीच्या ताणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रोहपाट (डुब्ली पोड) येथे घडली आहे. मृत शेतकऱ्याचे नाव भिमा तुकाराम आत्राम (वय 61) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिमा आत्राम हे रोजप्रमाणे सकाळी शेतावर गेले होते. मात्र पिकाचे नुकसान पाहून ते घरी परतले आणि मुलगा तुकाराम यांना “यंदा काही खरे नाही, पिकं गेली” असे सांगून खाली कोसळले. त्यांना तातडीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष असून, घटनेची नोंद मारेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.भिमा आत्राम यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

मार्डी–मच्छिन्द्रा–नांदेपेरा मार्गावर अवजड वाहतूक; रस्त्यांची लागली वाट

मारेगाव : मार्डी, मच्छिन्द्रा ते नांदेपेरा या मार्गावर दहा टनांपेक्षा जास्त वजनाची अवजड वाहतूक सुरू असून, त्यामुळे रस्त्यांची दैना झाली आहे. या बेकायदेशीर वाहतुकीबाबत परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मा. जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी 10 ऑक्टोबर 2022 रोजीच्या आदेशाद्वारे अवजड वाहतूक वडकी–खैरी–मारेगाव–वणी या मार्गाने वळविण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र या आदेशाकडे सर्रास दुर्लक्ष करून अवजड वाहने वडकी–खैरी–मार्डी–नांदेपेरा या मार्गाने धावत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.या अनधिकृत जड वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, धुळीमुळे वातावरण प्रदूषित झाले आहे. परिणामी शालेय विद्यार्थी, दुचाकीस्वार तसेच हलक्या वाहनधारकांना प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. या मार्गावर अपघातांचे प्रमाणही वाढले असून, नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

परिसरातील नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने अवजड वाहतूक थांबवून कठोर कारवाई करावी आणि खराब झालेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

सामूहिक गायगोधन गोपूजा सोहळा 2025 संपन्न

मारेगाव : अनेक वर्षाची परंपरा असलेला यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील टेकडीवरील माळावर (मोठा देव मंदिर ), (वणीवर पंधरा किलोमीटर तर मारेगाव वरून नऊ किलोमीटर अंतर) बलिप्रतिपदेच्या दिवशी बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर 2025 ला सकाळी ११.३० ते १.३० वाजेपर्यंत गायगोधनाचा सामूहिक सोहळा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या गायगोधन सोहळ्यासाठी चिंचाळा, वरुड, आकापुर, नेत, पाथरी, पारधी वस्ती, पिसगाव, पहापळ या गावांचे गुराखी /शेतकरी यांनी आपापल्या गावातील सजविलेल्या शेकडो गायींना या ठिकाणी पूजेसाठी वाजत गाजत आणल्या . मंदिराचे पुजारी श्री अंकुश गेडाम यांनी मोठा देवाची पूजा, आरती केली व त्यानंतर सजविलेल्या गाईंची मंदिराला प्रदक्षिणा मारण्यात आली. या प्रसंगी गुराखी मंडळी व त्यांचे सहकारी यांनी वादन गायन केले, गायगोधनाची गाणी, आरती सादर केली.भारतीय अर्थव्यवस्थेत सिंहाचा वाटा असणाऱ्या कृषी अर्थव्यवस्थेत गायीं / पशुधनाचे पर्यायाने गुराख्यांचे योगदान लक्षात घेऊन लक्षात घेऊन या सोहळ्यात 2022 पासून प्राध्यापक सुरेंद्र गोविंद नावडे यांच्या संकल्पनेतून गुराखी मंडळींचा सत्कार प्रथा सुरू करण्यात आली. यावर्षी श्री प्रज्योत भाऊराव खंडरे (चिंचाळा ) श्री शंकर गोविंदा नागोसे (वरूड) श्रीराम घोरपडे व श्री वैभव ढवळे (नेत ), श्री नंदू पोतू कोरझरे (साले भट्टी ) श्री संदीप मरसकोल्हे (गौराळा), श्री आशिष वाढई (आकापूर ) बाल गुराखी व वादक चिरंजीव विशाल रामभाऊ चाहारे (चिंचाळा ), अन्य गुराखी, पोलीस कर्मचारी व वनविभाग कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह तसेच राष्ट्रसंतांचा ‘ग्रामगीता’ ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.महिला गुराखी, बाल वादक तसेच महिलांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती आकर्षणाचा विषय ठरली.यवतमाळ जिल्ह्यात गाय गोधनाचे असे सामूहिक सोहळे अनेक ठिकाणी संपन्न होत असले तरी माडावरचा हा सोहळा टेकडी वजा परिसरात होत असल्याने दुरूनही नीट बघता येतो, या कारणास्तव या सोहळ्यात नागरिकांची उपस्थिती दर वर्षी वाढत आहे.मोठा देव मंदिराची जीर्णावस्था लक्षात घेता शासनाकडून जीर्णोद्धाराची अपेक्षा भाविक करत आहे . तसेच या ठिकाणी सोहळ्याच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी होते, त्यांच्या करिता पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी बोअरवेल खोदण्याची मागणी होत होत आहे .या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक सुरेंद्र गोविंद नावडे, श्री शशिकांत तावाडे (उपसरपंच, चिंचाळा ग्रामपंचायत ), श्री देवीदास भट (उपसरपंच वरुड ग्रा. पं.), श्री चंद्रकांत ढोबे (उपसरपंच, गौराळा ग्रा.पं.), श्री संदीप कारेकर (सरपंच आकापूर -नेत ग्रा. पं . ) व श्री दिवाकर रिंगोले यांनी परिश्रम घेतले .कार्यक्रम स्थळी मध्ये मद्यपान करून येणे, मद्यपान करणे व फटाके फोडणे याची सक्त मनाई असल्याने व श्री संजयजी देरकर (आमदार, वणी विधानसभा मतदार संघ), माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी; पोलीस निरीक्षक मारेगाव व वन विभाग मारेगाव यांच्या सहकार्याने इथे ठेवलेल्या कडक बंदोबस्तामुळे हा सोहळा अत्यंत शांततेत पार पडल्याने उपस्थित भाविक समाधानी होते .बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या या सोहळ्याला उर्जितावस्था अवस्था आणण्यासाठी 2022 पासून प्राध्यापक सुरेंद्र गोविंद नावडे, शशिकांत तावाडे, देविदास भट, चंद्रकांत धोबे, संदिप कारेकर व त्यांचे अन्य सहकारी परिश्रम घेत आहेत.

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद पार्श्वभूमीवर वणीत पोलिसांचे दंगा काबू प्रात्यक्षिक व रूट मार्च

वणी : आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सण शांततेत व सलोख्याने पार पाडण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वणी पोलिसांनी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक २६ ऑगस्ट, २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता (१७.०० वा.) टिळक चौक, वणी येथे दंगा काबू योजना राबवून शहरातील दाट वस्ती व प्रमुख मार्गांवरून रूट मार्च काढण्यात आला.याच अनुषंगाने दिनांक २८ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता शासकीय मैदानावर (माप ड्रिल) दंगा नियंत्रण प्रात्यक्षिक (Mock Drill) घेण्यात आले. त्यानंतर वणी शहरातील प्रमुख मार्गांवरून व दाट वस्तीतून रूट मार्च काढण्यात आला.या प्रात्यक्षिकात उपविभागातील शिरपूर, पाटण, मुकुटबन, मारेगाव पोलीस स्टेशनमधील अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड जवानांनी सहभाग घेतला. जमावाला पांगवण्यासाठी लागणाऱ्या विविध Schutz आणि साधनांचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले.पोलीस मुख्यालयातील यवतमाळ येथील कवायत निर्देशक ( Drill Instructor) सपोफौ. १1१२ बाबुसिंग राठोड, पो.हे.काँ. १६५९ श्रीकांत जयस्वाल, मपोहेकाँ/९३४ अर्चना सुपारे, मपोकाँ. १४७८ पुजा जुमनाके यांनी प्रात्यक्षिकाचे मार्गदर्शन केले.या प्रात्यक्षिकामध्ये लाठी, हेल्मेट, शिल्ड, गॅस गन, गॅस ग्रेनेड, पंप ॲक्शन गन, एस.एल.आर. रायफल, अश्रू शेल, लाँग रेंज शेल, स्टन शेल, वूड पियर्सिंग सेल, डाय मार्कर सेल इत्यादी शस्त्रांची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी वणी श्री. सुरेश दळवे, पोलीस निरीक्षक श्री. गोपाल उंबरकर (पोलीस स्टेशन, वणी) यांच्या समक्ष देण्यात आली.प्रात्यक्षिकासाठी वणी पोलीस स्टेशनमधील ०५ अधिकारी, २५ अंमलदार व २० होमगार्ड तसेच शिरपूर पोलीस स्टेशनमधील ०१ अधिकारी, ०५अंमलदार, मारेगाव पोलीस स्टेशनमधील ०१ अधिकारी, ०५अंमलदार, पाटण पोलीस स्टेशनमधील ०१ अधिकारी, ०४अंमलदारव ०३ होमगार्ड, मुकुटबन पोलीस स्टेशनमधील ०१ अधिकारी, ०१अंमलदारव ०३ होमगार्ड आणि पों.मु. येथील एस.एफ .चे ०९ अंमलदार असे एकूण ०९ अधिकारी, ४९अंमलदारव २६ होमगार्ड उपस्थित होते.या प्रात्यक्षिकामुळे आगामी सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

संताजी इंग्लिश मिडीयम स्कूल द्वारा आयोजित भक्तीगीत गायण स्पर्धेत अ गटात कु.रिधीमा शेजाळ तर,ब गटात मारेगाव चा प्रथमेश मोरे प्रथम

मारेगाव : नावातही प्रथम असलेला प्रथमेशने प्रथम येऊन मारेगाव चा सन्मान द्विगुणित केला. वणी येथे स्व. गणपतराव आडपावार स्मृती प्रित्यर्थ संताजी इंग्लिश मिडीयम स्कूल द्वारे ता. २४ ऑगस्ट रविवार ला आयोजीत करण्यात आलेल्या भक्तीगीत गायन स्पर्धेत मारेगाव येथील प्रथमेश मोरे याने प्रथम स्थान पटकवले. वणी येथील श्री संताजी ज्ञान प्रसारक मंडळाद्वारे स्व. गणपतराव आडपावार स्मृती प्रित्यर्थ पुत्र शैलेश आडपावार यांनी भक्तीगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात वणी, मारेगाव, घाटंजी, चंद्रपूर जिल्ह्यातील कुचना या गावातून तब्बल ५५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धा ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन गटात घेण्यात आली. ‘अ’ गटात २५ तर ‘ब’ गटात ३० स्पर्धक होते. ‘अ’ गटातून प्रथम आलेल्या रिधीमा सेजाळ हिला ५००० रु रोख व स्मृती चिन्ह देऊन गौरवण्यात आले.द्वितीय स्थानावर आलेल्या कु. राधा कुचनकर हिला ३००० रु रोख व स्मृतिचीन्ह, तिसऱ्या आलेल्या शौर्य शर्मा याला २००० रु. रोख व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच अर्णव चट्टे व वेदान्त करसे या दोघांना ५०० रु. रोख व स्मृतिचिन्ह भेट देऊन प्रोत्साहित करण्यात आले. ‘ब’ गटात प्रथम आलेल्या प्रथमेश मोरे याला ७००० रु रोख व स्मृतिचिन्ह, द्वितीय आलेल्या शाम शिंदे यांना ५००० रु.रोख व स्मृतिचिन्ह तृतीय स्थानी आलेल्या कु. तनवी कवाडे हिला ३००० रु. रोख व समूतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.तर कु. शर्वरी बाविस्कर, गौरांग सरमुकद्दम व त्र्यंबक जाधव यांना ५०० रु. रोख व स्मृतिचिन्ह देऊन प्रोत्साहित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण नायब तहसीलदार व गायक विवेक पांडे, संगीत शिक्षक रामचंद्र पवार आणि रवि घुमे यांनी केले तर, बक्षीस वितरण श्रीमती पुष्पाताई गणपतराव आडपावार व सौ.शितल आडपावार यांच्या हस्ते झाले. आयोजित कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रमेश येरणे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकेश दिकुंडवार,शीतल पारोधी,विद्या कठाणे, अर्चना गटलेवार, प्रिया कोणपतिवार,मंजुषा कोणप्रतिवार यांनी परिश्रम घेतले.संगीताची साथ अजित खंडारे, अभिलाष राजूरकर, अमोल बावणे, अक्षय करसे व अनिकेत गुजरकर यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन डिम्पल सोनी यांनी तर आभारप्रदर्शण शैलेश आडपावार यांनी केले.

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत करंजी कडून येणाऱ्या ट्रकची दुचाकीला जबर धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज रविवारला दुपारी एक वाजताचे सुमारास घडली.मुकेश ज्ञानेश्वर आडे (28)रा.बुरांडा असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.करंजीकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकी वरून जाणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वाराच्या डोक्याला जबर मार लागला. यातच मुकेश हा जागीच गतप्राण झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.दरम्यान, अपघातग्रस्त ट्रक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे.

यांत्रिक युगातही सर्जाराज्याच्या जोड्यांनी गाठला दिडशेचा आकडा

मारेगाव : तालुक्यात सर्वच गावखेड्यात पोळा सण उत्साहात साजरा झाला. मारेगाव शहरात तब्ब्ल दिडशे च्या वर बैल जोड्यांच्या सहभागाने यांत्रिक युगातही बैलांचं असाधारण महत्व लक्षात आलं.भारत हा कृषिप्रधान देश असून पूर्वी कृषी ही शंभर टक्के बैलजोड्यावरच अवलंबून होती मात्र विज्ञानाने प्रगती होत गेली व यंत्र क्रांती उदयास आली ह्या क्रांतीने शेतकऱ्यांची अवघड कामं सुलभ झाली व हळूहळू बैल जोड्यांची जागा ट्रॅक्टर,जेसीबी ने घेतली पण बैलाच्या मदतीने जी कामं केली जातात ती यंत्रांना जमणार नाही, नेमकी याचीच प्रचिती आज पोळ्यामध्ये आली. भारतात बैल हा शेतकऱ्यांचा मित्र आहे.मात्र शेती मशागतीसाठी अस्तित्वात आलेली वेगवेगळी यंत्रामुळे बैल पाळणे सुद्धा लोकांना कठीण काम वाटते. परंतु पूर्वीच्या काळी प्रत्येक घरामध्ये बैलगाडी असायची त्यावर बसून शेतामध्ये जायचे, शेतातील कामे बैलांच्या मार्फत होत होते. पूर्वी बैलांचा वापर शेतामध्ये नांगर करण्यासाठी व शेतातील निघालेले पीक घरी नेण्यासाठी किंवा अवघड काम करण्यासाठी केला जायचा. आता सुद्धा ग्रामीण भागामध्ये ही कामे होताना आपल्याला दिसतात. परंतु बैलांच्या संख्येमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. उत्स्फूर्त भरलेल्या पोळ्यात मात्र मारेगाव मार्डी रोड वर पडलेले मोठमोठे खड्डे जणू बघ्यांना वाकुल्या दाखवत होते.