मार्डी–मच्छिन्द्रा–नांदेपेरा मार्गावर अवजड वाहतूक; रस्त्यांची लागली वाट

October 28, 2025

मारेगाव : मार्डी, मच्छिन्द्रा ते नांदेपेरा या मार्गावर दहा टनांपेक्षा जास्त वजनाची अवजड वाहतूक सुरू असून, त्यामुळे रस्त्यांची दैना झाली आहे. या बेकायदेशीर वाहतुकीबाबत परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मा. जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी 10 ऑक्टोबर 2022 रोजीच्या आदेशाद्वारे अवजड वाहतूक वडकी–खैरी–मारेगाव–वणी या मार्गाने वळविण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र या आदेशाकडे सर्रास दुर्लक्ष करून अवजड वाहने वडकी–खैरी–मार्डी–नांदेपेरा या मार्गाने धावत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.या अनधिकृत जड वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, धुळीमुळे वातावरण प्रदूषित झाले आहे. परिणामी शालेय विद्यार्थी, दुचाकीस्वार तसेच हलक्या वाहनधारकांना प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. या मार्गावर अपघातांचे प्रमाणही वाढले असून, नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

परिसरातील नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने अवजड वाहतूक थांबवून कठोर कारवाई करावी आणि खराब झालेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.