ऑपरेशन प्रस्थान’ अंतर्गत नेर येथे मुलींसाठी व्यापक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

January 24, 2026

वणी : मुलींच्या सुरक्षिततेसह सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन प्रस्थान’ उपक्रमांतर्गत नेर येथे दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा दि. २३ व २४ जानेवारी रोजी नेर येथील सुप्रभा मंगल कार्यालयात पार पडली.या कार्यशाळेत नेर येथील दि. इंग्लिश हायस्कूल, शिवाजी हायस्कूल, जिजामाता कन्या शाळा, जीवन विकास विद्यालय, एलिगंट स्कूल यांसह इतर शाळा व महाविद्यालयांमधील एकूण ७८७ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

कार्यशाळेदरम्यान विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी कराटे, सायबर सुरक्षा, व्यसनमुक्ती, वाहतूक नियम, नागरी शिस्त, महिलासंबंधी कायदे तसेच किशोरवयीन आरोग्य या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कराटे प्रशिक्षण डॉ. आनंद भुसारी, आरोग्यविषयक मार्गदर्शन डॉ. माने, व्यसनमुक्तीबाबत डॉ. भारत चव्हाण, वाहतूक नियमांबाबत जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते तसेच महिलांसंबंधी कायद्यांवर सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी गुल्हाने यांनी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या समारोपीय सत्रात जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या अध्यक्षतेखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी काही विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी ‘ऑपरेशन प्रस्थान’ उपक्रमामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे सांगून, यशस्वी आयोजनाबद्दल नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल बेहरानी व संपूर्ण पोलीस पथकाचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव देशमुख, तर आभार योगेश दंदे यांनी मानले. या उपक्रमाचे आयोजन ठाणेदार अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत ९ हजार मुलींना ‘ऑपरेशन प्रस्थान’ अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले आहे.