कॉग्रेस च्या चक्काजाम आंदोलनाचा धसका, वेकोली प्रशासन नमली

August 26, 2025

वणी : वेकोलि खाण परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्था व इतर मूलभूत समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसतर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सोमवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजल्यापासून उकणी येथील खाण रोडवरील बसस्टॉपजवळ हे विराट चक्काजाम आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन तब्बल साडेतीन तास चालले. आंदोलनात सुमारे 300 पेक्षा अधिक आंदोलक सहभागी झाले होते. वेकोलिच्या आश्वासनानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले. काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले.

सकाळी 6 वाजता उकणी येथील खाण रोडवरील बसस्टॉपवर लोकांनी गोळा होण्यास सुरुवात केली. काही वेळातच शेकडो आंदोलक घटनास्थळी गोळा झाले. दरम्यान वेकोलिचे कर्मचारी देखील आंदोलनात सहभागी झालेत. त्यामुळे आंदोलकांची संख्या 300 पेक्षा अधिक झाली. यावेळी वेकोलि प्रशासनाविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. उकणी खाणीकडे जाणारा रस्ता अडवण्यात आल्याने या मार्गावर वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली.

आंदोलनात काँग्रेसचे प्रमोद वासेकर, पुरुषोत्तम आवारी, अशोक चिकटे, वासूदेव विधाते, सुनील वरारकर, सतीश खाडे, बंडू बोंडे, बंडू गिरटकर, सुरेश ढपकस, प्रभाकर खोब्रागडे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. परिसरातील गावातील रहिवासी, वेकोलि कर्मचारी, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलन यशस्वी झाल्याने गावकरी व वेकोलि कर्मचारी समाधान व्यक्त करण्यात आले.