58.75 कोटी रुपये खड्ड्यात

August 30, 2025

वणी : वणी -मुकुटबन राज्य मार्गावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात आदळून अनेक अपघात होत आहेत. वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन जायचे तरी कसे? असा सवाल प्रवासी व नागरिकांनी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला केला आहे.

वणी – कायर, पुरड हा राज्य मार्ग 23.50 किलोमीटर लांबीचा, या रस्त्याचे काम 2018-19 पासून भारत सरकारच्या केंद्रीय सडक निधी परियोजना माध्यमातून सुरु करण्यात आले आणि दोन ते तीन वर्षांपूर्वी पूर्ण झाले. मात्र, या मार्गाच्या कामाच्या दर्जाच्या बाबत अनेकांनी प्रश्न निर्माण केला आहे. शासनाकडून सुमारे रु.5875.00 लक्ष रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या मार्गाच्या दुरावस्थेमुळे प्रवासी व नागरिक संतप्त आहेत. या मार्गावरील खड्डे योग्य प्रकारे भरण्यासाठी स्थानिकांनी मागील दोन वर्षांपासून निवेदने केली. खड्ड्यामंध्ये झाडे लावून आंदोलनही करण्यात आले. मात्र, अजुनपर्यंत कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी मानकी शिवारातील वाघदोडा पुलाजवळ खड्ड्यात तिन चाकी ऑटो पलटी होऊन एक तरुण गंभीर जखमी झाला होता. तर असे अपघात या मार्गावरील खड्ड्यांमुळे नित्याचेच झाले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) अजून किती अपघातांची वाट बघणार आहे.

वणी- कायर मार्गावर मानकी गावापर्यंत चार किलोमीटर अंतरावर जागोजागी खड्डे पडले आहेत त्यामुळे अनेक अपघात घडत आहे खड्ड्यांमुळे अपघात होऊन जिवीतहानी होण्याअगोदर या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून खड्डे चांगल्या प्रकारे भरण्यात यावेत. अन्यथा जनआंदोलन केले जाईल.

गुरुदेव चिडे, सामाजिक कार्यकर्ते