युवासेनेच्या निवेदनाची घेतली तात्काळ दखल

August 31, 2025

वणी : महावितरण उपविभागीय कार्यालयाचे तिसऱ्या मजल्यावर स्थलांतर झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत होता. लिफ्ट बंद असल्याने वृद्ध, महिला, शेतकरी व ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांना कार्यालयात पोहोचणे ही मोठी समस्या निर्माण झाली होती.या गंभीर प्रश्नावर युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी कार्यकारी अभियंता महावितरण यांना निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. अन्यथा महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला होता.युवासेनेच्या निवेदनाची प्रशासनाने तात्काळ दखल घेतली असून नागरिकांच्या सोयीसाठी लवकरच आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी युवासेना नेहमीच कटिबद्ध राहील, असा विश्वास अजिंक्य शेंडे यांनी यावेळी व्यक्त केला.