• काळ आला होता, पण वेळ नाही
• सतिघाट पुलावरील घटना
टोलेबाज न्यूज वार्ता :
वणी : ‘काळ आला होता, पण वेळ नाही’ या वाक्प्रचाराचा प्रत्यय देणारी घटना मागील दोन तीन दिवसा आधी वणी येथील सतिघाट पुलावर घडली होती. त्यावेळी निर्गुडा नदीचे पाणी पुलावरून वाहत असताना पूल पार करण्याच्या प्रयत्नात एक 60 वर्षीय इसम पुराच्या प्रवाहासोबत वाहून गेला होता. पण नशिब बलवत्तर म्हणून एक झाड हाताला लागले आणि तेच त्याच्यासाठी जीवनदाता ठरले. अखेर घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारला सकाळी रेक्यु करुन त्याला पुरातून बाहेर काढण्यात नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता.1) रात्री सुकनेगाव येथिल कवडू पुसाम हा इसम आपल्या गावी येण्यासाठी निघाला होता. परंतु निर्गुडा नदिच्या सतिघाट पुलावरून पाणी होते. हळूहळू पुढे सरकत त्याने पूल पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवाहाच्या वेगाने तो घसरून पाण्यात पडला. नंतर सावरणे कठीण झाल्याने तो पाण्यासोबत वाहून जाऊ लागला. काही अंतरावर नदीपात्रातील एक झाड त्याच्या हाती लागले. प्रसंगावधान राखत त्याने रात्रभर झाडाला घट्ट पकडून ठेवले. सकाळी त्याला नगर पालिकेचे कर्मचारी कुंदन तोमस्कर आणि सुरेश तंबोली यांनी रेक्यु करुन तब्बल आठ नऊ तासांनंतर कवडू ला बाहेर काढण्यात यश आले. सध्या वणी परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे पावसामुळे नदी नाल्यांना पुर आलेला असताना नागरिकांनी पुराच्या पाण्यातून जिव धोक्यात घालून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.













