•पत्रकार परिषदेत कुटुंबियांचा वणी पोलिसांवर गंभीर आरोप.
टोलेबाज न्युज वार्ता :
वणी : विवाहित तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी दोषी असलेला आरोपी पती गेल्या ५० दिवसापासून मोकाट असून त्याचेवर वणी पोलिस कारवाई करत नसल्याचे वणी येथील विश्राम गृहात पत्रकार परिषदेत मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले. सविस्तर वृत्त असे की,पतीच्या छळाला कंटाळून एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना ता.१९ जुलै २०२५ रोजी शहरालगत असलेल्या वणी- मुकुटबन मार्गावरील साईलीला नगरी येथे घडली होती. सदर प्रकरणात मृतक विवाहित तरुणीचे वडील किशोर करमरकर यांच्या तक्रारीवरून मयत युवतीचे पती, सासू व नणंद विरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आत्महत्येच्या घटनेल ५० दिवस उलटूनही पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या पतीला वणी पोलिसांनी अटक केली नाही.तक्रारदार वडील व कुटुंबीयांनी तीनदा उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. परंतु मुख्य आरोपी पती अद्यापही मोकाट फिरत आहे.त्यामुळे मयत आरती जयबुद्ध बुरचुंडे हिचे वडील किशोर भाऊराव करमरकर, आई रेखा करमरकर, भाऊ शुभम करमरकर, बहीण पूजा पुडके आणि जावई राहुल पुडके यांनी रविवारी ७ सप्टेंबर रोजी वणी येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन वणी पोलिसांवर निष्क्रियेताचा आरोप लावला. तसेच पीडित कुटुंब उद्या सोमवारी ८ सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन न्याय मागणार असल्याचे फिर्यादी किशोर करमरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी तिचे पती जयबूद्ध संकल्प बूरचुंडे, सासू प्रतिमा बुरचुंडे व नणंद, सर्व रा. मातोश्रीनगर, जीवक वाचनालय जवळ, वरोरा, जिल्हा चंद्रपूर विरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी सासू व नणंद यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिली.मात्र मुख्य आरोपी पती जयबूद्ध संकल्प बूरचुंडे यांनी दाखल केली अग्रिम जामीन याचिका हायकोर्टाने फेटाळली. मात्र त्यानंतरही वणी पोलिस आरोपीला अटक करण्यास टाळाटाळ करीत आहे.पोलिसांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने मृतक व कुटुंबियांना न्याय मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.माहितीनुसार आरती बुरचुंडे हिने आत्महत्या केल्यानंतर जेव्हा फिर्यादी वडील तक्रार देण्यासाठी वणी पोलीस स्टेशनमध्ये पोहचले, तेव्हा वरोरा येथील पोलीस निरीक्षक दर्जाचा एक अधिकारी व एक वकिलांनी त्यांची भेट घेऊन पोलीस तक्रार न करता परस्पर देवाण घेवाण करून प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. असा खुलासा फिर्यादी यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे महिला अत्याचार व हुंडाबळीच्या प्रकरणात दलाली करणारा तो पोलीस अधिकारी कोण ? याचाही खुलासा पोलिसांनी करावा. अशी मागणी होत आहे.













