वंचितचा लढाच जुलूमी व्यवस्थेला हानून पाडेल. राजू निमसटकर.

September 12, 2025

समाज संघटित करण्याबरोबरच वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी मारेगांव तालुक्यातील सर्वहारा शोषित, आदिवासी, वंचित, बहुजन समाजातील जाणत्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून दिनांक १० सप्टेंबर रोज बुधवार ला मारेगांव येथील बदकी भवन सभागृहात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. वंचित बहुजन आघाडीचे राजू निमसटकर यांच्या नेतृत्वात आयोजित मेळाव्याला लाभलेली जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांसह नव्या दमाच्या उत्साही कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती वंचित बहुजन आघाडीला अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने उत्साह निर्माण करणारी होती.

वंचित बहुजन आघाडी ही वंचित, शोषित,पीडित,शेतकरी,कष्टकरी, सर्वहारा शोषित बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी राजकीय संघटना असून जुलमी मनुवादी राजकीय व्यवस्थेविरुद्ध संघटितपणे लढायचे असेल तर आता श्रद्धेय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय अर्थातच वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही. असे परखड मत शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यामध्ये बोलताना वंचित बहुजन आघाडीचे राजु निमसटकर यांनी व्यक्त केले.

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सर्वहारा-शोषित-वंचितांच्या न्यायाची लढाई लढणारा एकमेव लढवय्या म्हणून, उभा समाज प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघतो आहे. परमपूज्य बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी केवळ वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव राजकीय पर्याय आणी सत्य आता सर्वांसमोर आहे. म्हणूनच वंचित बहुजन आघाडी हा सत्तेच्या राजकारणात बलशाली राजकीय पक्ष व्हावा, ही आपल्या सर्वांची गरज आहे, नव्हे तर ती आपल्या सर्वांची जबाबदारी देखील आहे. हीच सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित व्यवस्थेवर घनाघात करणारी असेल. यासाठी संघटितपणे लढण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा, असे आवाहन राजू निमसटकर यांनी उपस्थित जनतेस केले.

आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल यांच्या पदाधिकाऱ्यांसह अमरनाथ तेलतुंबडे, तात्याजी पाटील चिकाटे, अजाबराव गजभिये, यशवंतराव भरणे, गौतम तकसांडे या जुन्या जाणत्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची मेळाव्याला विशेष उपस्थिती होती. विशेषतः ग्रामीण भागातून आलेले शेकडो कार्यकर्ते व खास करून महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती वंचित बहुजन आघाडीच्या पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्याला ऊर्जा देवून गेली. विशेष म्हणजे याच कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सर्वांच्या उपस्थितीत लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडी मारेगांव तालुका ग्रामीण व मारेगांव शहर पुरुष व महिला कार्यकारिणीचे निर्माण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.अविनाश घरडे यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल देखील सन्मानित करण्यात आले. येत्या काही दिवसातच नवनियुक्त कार्यकारीणीला अधिक मोठे रूप दिल्या जाईल व त्यांचा पदाधिकारी पदग्रहण सोहळयांसह पक्षप्रवेश सोहळा देखील आयोजित करू असा विश्वास उपस्थित सर्वांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य गौतमजी मालखेडे यांनी केले. तर वंचित बहुजन आघाडीचे नवनियुक्त मारेगांव तालुकाध्यक्ष ग्रामीण ज्ञानेश्वर मुन यांनी कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाचे वासू वनकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी यशस्वी प्रयत्न केले.