उद्या २५ ला मारेगावात वंचितचा ‘आक्रोश मोर्चा’

September 24, 2025

​मारेगाव येथील “बदकी भवन” मंगल कार्यालयाचे भव्य सभागृहात २५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते समाजाच्या सध्याच्या स्थितीवर चिंतन करतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ‘संघटित व्हा’ या संदेशाची आठवण करून देत, समाजाने कशा प्रकारे एकजुटीने काम केले पाहिजे, यावर विचारमंथन होईल. हा मेळावा केवळ एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसून, समाजाला नवी दिशा देणारा आणि त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा एक महत्त्वाचा टप्पा असेल.

​मेळाव्यानंतर, समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे. हा मोर्चा मारेगाव तहसील कार्यालयावर धडक देईल आणि प्रशासनाला निवेदन सादर करेल. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांचे सह जिल्हा पदाधिकारी करणार आहेत. समाजाचा आक्रोश आणि मागण्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे, हे या मोर्चाचे उद्दिष्ट आहे.

प्रमुख मागण्या…

१) महाबोधी महाविहार
बौद्धांच्या ताब्यात द्या.
बौद्ध धर्मियांसाठी सर्वात पवित्र स्थळ असलेल्या बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन आजही हिंदू धार्मियांचे ताब्यात आहे. त्याचे हिंदूकरन केल्या जात आहे आणि ते पवित्र स्थळ अजूनही बौद्ध धर्मियांच्या पूर्णपणे नियंत्रणाखाली नाही. त्यामुळे, या महाबोधी महाविहाराचा कारभार तात्काळ बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावा, महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशी तीव्र मागणी या मोर्चातून करण्यात येणार आहे.
२) शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा, सातबारा कोरा करा.
विदर्भासह संपूर्ण राज्यातील बळीराजा शेतकरी अनेक वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकटांशी झुंज देत आहेत. यंदाच्या अतिवृष्टीने तर त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे, सरकारने कोणताही विलंब न करता शेतकऱ्यांचे सर्व कर्ज सरसकट माफ करावे आणि त्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी आक्रोश मोर्चाचे माध्यमातून करण्यात येणार आहे.
३) ओला दुष्काळ जाहीर करा.

अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खरीपाची पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. निसर्गाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सर्वहारा-आदिवासी-शोषित-वंचितांच्या न्यायाची लढाई लढणारा एकमेव लढवय्या म्हणून, उभा समाज आदरणीय श्रद्धेय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघतो आहे. परमपूज्य बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी केवळ “वंचित बहुजन आघाडी” हाच एकमेव राजकीय पर्याय आणी सत्य आता आपल्या सर्वांसमोर आहे. म्हणूनच, “वंचित बहुजन आघाडी” हा सत्तेच्या राजकारणात बलशाली राजकीय पक्ष व्हावा, आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राजू निमसटकर यांनी केले आहे.