टोलेबाज वार्ता पत्र :रवि घुमे : मारेगाव
पावसाच्या अघोरी रुपड्यानं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं असतांना शेतीवाडया सहित वस्त्यांचही नुकसान होऊन शेतकरी मेटाकुटीस आला. मात्र सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्या ऐवजी जिल्हा वगळला होता. सरकार विरोधकांना फंड देत नाही,चालेल आम्हाला फंड नको तर शेतकऱ्यांना त्याच्या मालाला योग्य भाव द्या असे प्रतीपादन वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी मार्डी येथील उपोषण मंडपात उपस्थीत शेतकऱ्यां समोर बोलतांना केले.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे तालुका शाखा मारेगावच्या वतीने मार्डी येथे तीन दिवसा पासून विविध मागण्यासाठी उपोषण सुरु होते. या समस्या मध्ये ओला दुष्काळ जाहीर करणे, रस्ते खड्डेमुक्त करणे, विजेचा लंपडावा पासून मुक्ती, १३२ के.व्ही.सबस्टेशन सुरु करणे,अवैध व्यवसाय बंद करणे इत्यादी मागण्याचा समावेश होता.सलग तीन दिवस उपोषण करून तिसऱ्या दिवशी उपोषणाची सांगता करण्यात आली.
दरम्यान आ.देरकर यांनी उपोषण मंडपात भेट देऊन सबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चे अंती उपोषणकर्त्याचे लेखी आश्वासनावर समाधान झाल्या नंतर आ.देरकर यांचे हस्ते उपोषण कर्त्यांना सरबत पाजुन उपोषण सोडले. यावेळी तहसिलदार उत्तम निलावाड, मारेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्क ठाणेदार विक्की जाधव, विद्युत विभागाचे अभियंता शामसुंदर कुर्रा, उप अभियंता नरेंद्र खटारे,जिल्हा परिषदेचे अभियंता संजय शिंदे,यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
मार्डी येथील बाजार चौकात बेमुदत उपोषणास बसलेल्या आंदोलनकर्त्यां मध्ये तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुटे, सचिव दिवाकर सातपुते, संपर्क प्रमुख सचिन पचारे, उपतालुका प्रमुख विजय अवताडे,माजी खरेदी विक्री उपाध्यक्ष शरद ताजणे या पाच पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.यावेळी आ.देरकर यांच्या सोबत शिवसेना नेते,प्रशांत पाचभाई,जिल्हा प्रमुख संजय निखाडे,विधानसभा प्रमुख सुनिल कातकडे,जिल्हा संघटक सुधिर थेरे,उप जिल्हा संघटीका सरपंच डिमनताई टोंगे,नगराध्यक्ष डॉ.मनिष मस्की सोबत होते. लेखी आश्वासनाची पुर्तता न झाल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा ईशारा देऊन उपोषण मागे घेण्यात आले.













