वीज कोसळून बैलाचा मृत्यू; शेतकरी किरकोळ जखमी

September 27, 2025

मारेगाव:तालुक्यातील श्रीरामपूर (कुंभा) येथे आज दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोज शुक्रवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास वीज कोसळून एक बैल जागीच ठार झाला, तर शेतकरी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली.

गोपाळ मारोती शेंडे (वय ५५, रा. कुंभा) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. शेंडे हे नेहमीप्रमाणे आपल्या श्रीरामपूर (कुंभा) येथील गट क्रमांक ३ मधील शेतात बैल चारण्यासाठी गेले होते. दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. याच दरम्यान शेंडे यांच्यावर वीज कोसळली. यात त्यांचा एक बैल (अंदाजे किंमत १ लाख रुपये) जागीच मृत झाला.

घटनेत शेंडे हे सौभाग्याने बचावले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती होताच तलाठी कमलेश अनिल सुरावार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.