रास गरबा मधून माँ अंबेची आराधना

September 27, 2025

जनहित कल्याण महिला संघटनेच्या गरबा उत्साहात रंगत;

मारेगाव :नवरात्रोत्सवा च्या पावन पर्वावर जनहित कल्याण समितीचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांच्या सौजन्याने जनहित कल्याण महिला संघटनेतर्फे नगरपंचायत प्रांगणात शिवगर्जना दुर्गोत्सव मंडळा देवीसमोर भव्य रास गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. महिलांनी गरब्याच्या तालावर नृत्य सादर करत माँ अंबेची भक्तीमय आराधना केली.

नवरात्र उत्सव म्हणजे स्त्री सत्ताक संस्कृतीचा उत्सव. याच भावनेतून मारेगावमध्ये आयोजित या उत्सवात महिलांचा व लहान मुलींचा उत्साह पाहण्यासारखा होता. चार गटांमध्ये घेण्यात आलेल्या या गरबा स्पर्धेत सहभागींसाठी आकर्षक बक्षिसांची रेलचेल ठेवण्यात आली आहे. त्यात इलेक्ट्रिक स्कुटी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, लॅपटॉप, अँड्रॉइड मोबाईल, बायसिकल अशा मोठ्या बक्षिसांसोबतच सिल्वर कॉइन, पैठणी साडी, हेडफोन आणि लहान मुलींसाठी विशेष गिफ्ट्स चा समावेश आहे.

या बक्षिसांमुळे महिलांचा व मुलींचा उत्साह आणखी उंचावला असून, मोठ्या संख्येने त्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून देवीचा गजर करत उत्सवाला रंगत आणली.
गरबा प्रशिक्षक विकास यांनी महिलांना शिस्तबद्ध पद्धतीने गरब्याचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या मेहनतीमुळे सादरीकरणाला विशेष उठाव मिळाला. दरम्यान, सतत कोसळणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवरदेखील महिलांचा उत्साह द्विगुणित झाला होता. शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमादरम्यान पावसाने थोडी विश्रांती दिल्याने उत्सव निर्विघ्न व भव्यदिव्य पार पडला.

नगरपंचायत प्रांगणात भरलेल्या या रास गरबा उत्सवामुळे नवरात्रोत्सवाचे पर्व भक्तिमय, उत्साही आणि आनंददायी वातावरणात साजरे झाले.