टोलेबाज वार्ता पत्र :
वणी: महाराष्ट्रात वारंवार आदिवासी आरक्षणावर घुसखोरीचे प्रयत्न होत असल्याने मूळ आदिवासी समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. सध्या बंजारा व धनगर समाज हैदराबाद गॅजेटचा दाखला देत आदिवासी समाजात समाविष्ट करण्याची मागणी करीत असून शासनावर दबाव आणण्यासाठी ठिकठिकाणी मोर्चे आंदोलन सुरू आहेत.
मात्र, बंजारा व धनगर समाज हे आदिवासी नसून त्यांना स्वतंत्र आरक्षणाचा लाभ आधीपासून दिलेला आहे. तरीदेखील आदिवासींमध्ये समाविष्ट करून आरक्षण मिळविण्याची मागणी हा भारतीय संविधानाचा भंग करणारा व संविधानाबाह्य निर्णय ठरेल, असा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे.
आधीच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय दृष्ट्या कमकुवत असलेल्या आदिवासी समाजाचे हक्क हिरावले जाणार असल्याने आदिवासी हक्क व आरक्षण बचाव कृती समिती वणी, झरी, मारेगाव तसेच विविध आदिवासी संघटनांच्या नेतृत्वाखाली २९ सप्टेंबर २०२५ रोजी सोमवारला दुपारी १२ वाजता वणी शहरात भव्य आरक्षण बचाव आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या अस्तित्वाचे आणि हक्काचे रक्षण करण्यासाठी आदिवासी समाजाने एकत्र यावे, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.













