टोलेबाज वार्ता पत्र :रवि घुमे.
वणी: वणी येथील जगद आई म्हणजे जैताई मंदिरात परंपरेनुसार सुरु असलेल्या चार दिवशीय कीर्तन सेवेपैकी तिसऱ्या दिवशी ते, “हेची थोर भक्ती आवडते देवा | संकल्पावी माया संसाराची || या संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अभंगावर निरूपण करीत होते.
आपले प्रत्येक कार्य करतांना मी जे करीत आहे ते भगवंताला आवडायला हवे, असं नव्हे. खरे तर जे भगवंताला आवडते तेच कार्य मी करायला हवे. भगवंताला आवडणाऱ्या कार्याचा सेट-अप बिघडला तर माणूस अप-सेट होतो.म्हणून मानवाच्या हातून भगवंताला आवडणारेच कार्य घडायला पाहिजे. संतांनी मानवाला उपदेश करताना कधीही कंटाळा केला नाही. उलट त्याचा उद्धार होईपर्यंत त्याचा पाठपुरावा केला, कारण समोरच्या जीवाची माया दूर करणे हेच त्यांचे कार्य होते आणि अशी माया सुटणे यालाच थोर भक्ती म्हणतात.” असे विचार पुणे येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्रेयस महाराज बडवे यांनी व्यक्त केले.
जीवनामध्ये भगवंताला शरण जाणे हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. परंतु शरण जाणे हे वाटते तितके सहज नाही कारण त्यात रण आहे. आपलाच आपल्या सोबतचा हा संघर्ष आहे. आपल्यातील दुर्गुणांचा विनाश केला तरच शरण जाता येते. अशा स्वरूपात त्यांनी अभंगाचे अंतरंग उलगडून दाखविले.
मध्यंतरामध्ये श्री बंडोपंत भागवत यांनी कीर्तनकारांचा सन्मान केला. श्री अरुण दिवे यांनी प्रेमभावे ओवाळीतो गीत तुझे गाऊनी ! हे जगदंबे मातेचे स्तवन सादर केले.
उत्तररंगात अवंती नगरीत म्हणजे उज्जयिनी मध्ये भगवान महांकालाच्या मंदिरामध्ये राजा रामभद्र आणि श्री मच्छिंद्रनाथांचा संवाद स्वरूप कथाभाग सादर करीत पुढच्या जन्मी राजा रामभद्राची गुणवती नाम पत्नी मुक्ताई रूपात तर तो राजा चांगदेवांच्या रूपात अवतरीत झाल्याची कथा सांगून बडवे बुवांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कीर्तनाला संवादिनीवर अरुण दिवे तर तबल्यावर शुभम बोबडे यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले.
कीर्तन मालिकेच्या वाढत्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करून अधिकाधिक वणीकरांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे सचिव ह.भ.प. मनु महाराज तुगनायत यांनी केले आहे.













