- मारेगाव तालुक्यात पहिल्यांदाच भाषेत परिवर्तन
- शासनाचा अभिनव उपक्रम
टोलेबाज वार्ता पत्र : रवि घुमे : मारेगाव
कोलामी ही कोलाम या आदिवासी समूहाची अलिखित बोलीभाषा आहे.कोलाम समूहातील दुर्गम भागात (पोड) रहिवाशी असलेल्या आबाल थोरांना मराठी भाषा पाहिजे त्या प्रमाणात अवगत नाही किंबहुना असेल तरी त्यांना बोलने, समजण्यासाठी अवघड होते.शासन प्रशासनात कोलामी भाषेला नगण्य महत्व असतांना या कोलाम समाजाच्या मुख्य भाषेवरून अनेक अडचणींचा समाजाला सामना करावा लागतो आहे. मात्र यात कमालीचे परिवर्तन करून मारेगाव येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्पा अंतर्गत घेण्यात आलेल्या मुलाखतीत पेसा अंतर्गत व कोलाम समाजाच्या उमेदवारांना सुलभता निर्माण करण्यासाठी थेट कोलाम समाजाच्या बोलीभाषेत मुलाखती घेण्यात आल्या. बहुदा तालुक्यात पहिल्यांदाच बोलीभाषेचा डंका प्रशासनात गुंजल्याने कोलाम समाजात समाधान व्यक्त होत आहे.
दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोज मंगळवार ला बालविकास प्रकल्प कार्यालय मारेगाव येथे मारेगाव तालुका अंतर्गत येणाऱ्या मौजा पेंढरी, खंडणी (गावपोड), म्हैसदोडका गावपोड, हिवरी गावपोड येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त पदासाठी कोलामी बोलीभाषेत मुलाखती घेण्यात आल्या.
ज्या पोडात, वस्तीत, तांड्यात ५०% पेक्षा अधिक एकाच जमातीचे मुलं असतील , त्या पोडात, वस्तीत, किंवा तांड्यात जी भाषा बोलणारे मुलं अधिक असतील ती भाषा अवगत असणाऱ्या उमेदवाराला नियुक्ती देण्यासाठी शासनाने हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मुलांसोबत संवाद साधण्यासाठी उमेदवाराला त्यांची भाषा (बोली) अवगत असणे गरजेचे आहे. या नावीन्यपूर्ण निर्णयामुळे निश्चितच ग्रामीण भागातील (कोलाम पोडातील) मुले शिक्षणाच्या प्रवाहात येतील आणि त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल असा आशावाद व्यक्त होत आहे.
मुलाखती करिता कोलामी बोली तज्ञ म्हणून तालुक्यातील शिक्षक
पैकुजी आत्राम, वासुदेव टेकाम, सुरेश आत्राम यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुलाखती देण्याकरिता १५ अंगणवाडी सेविका आणि १५ मदतनीस सहभागी होत्या.













