टोलेबाज वार्ता पत्र :
वणी: आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी वणी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून यंदा हे पद अनुसूचित जमाती (एस.टी.) महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे अनेक दिग्गज आणि अपेक्षित उमेदवारांचा हिरमोड झाला आहे, तर दुसरीकडे योग्य उमेदवारांच्या शोधाला आता वेग आला आहे.
नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबतची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच प्रसिद्ध केली. मागील कार्यकाळात हे पद सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी राखीव होते. यावेळी आरक्षण बदल झाल्याने राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत. स्थानिक पातळीवर सक्रिय असलेल्या अनेक नेत्यांना आता आपल्या उमेदवारीच्या शक्यता धूसर झाल्याचे जाणवू लागले आहे.
दरम्यान, विविध राजकीय पक्षांनी अनुसूचित जमाती प्रवर्गातील सक्षम, लोकप्रिय आणि कार्यकर्त्यांशी निगडित अशा उमेदवारांच्या शोधास सुरुवात केली आहे. पक्षांमध्ये यासाठी हालचाली सुरू असून, येत्या काही दिवसांत नावांची चर्चाही गती घेईल, अशी माहिती पक्षस्रोतांकडून मिळाली.
शहरातील मतदारसंघांमध्ये आरक्षणामुळे निर्माण झालेल्या नव्या राजकीय समीकरणांमुळे निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या अपेक्षा, स्थानिक प्रश्न आणि नव्या उमेदवारांची क्षमता यावरच यंदाच्या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.













