“ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत “गुन्हेगारांना रोजगाराचे आश्वासन
टोलेबाज वार्ता पत्र :अभय गावंडे, यवतमाळ
वणी : यवतमाळ मा. पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांनी यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याच्या उद्दशाने एक आगळी वेगळी मोहीम राबवून घडणाऱ्या गुन्ह्याची पडताळणी करून गुन्हेगाराचा गुन्ह्यातील सहभाग, सराईत गुन्हेगार, दोन किंवा अधिक गुन्हे शिरावर असलेले गुन्हेगार यांचा सामाजिक दृष्टीने त्यांच्या मानसिकतेत बदल व्हावा व त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करता यावे याकरिता दि.११ ऑक्टोबर २०२५ रोजी एक आगळीवेगळी मोहीम राबविण्यात आली.
मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक उपविभाग स्तरावर उपविभागीय पोलीस अधिकारी त्यांच्या कार्यालय तसेच जिल्हास्तरावरील यवतमाळ उपविभागातील सर्व पोलीस ठाणे यांना पोलीस मुख्यालय यवतमाळ येथे पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर असलेले हिस्ट्रीशीटर, निगराणी बदमाश व दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे नोंद असणारे सराईत गुन्हेगार यांना एकत्र आणून त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्याकरिता समुपदेशन व्हावे व ज्यांना प्रामाणिकपणे रोजगाराची संधी हवी आहे अशा गुन्हेगारांना ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत रोजगाराची संधी उपलब्ध करून देता यावी याकरिता मा. पो. अधीक्षक श्री कुमार चिंता यांनी ही आगळी वेगळी मोहीम राबविण्याचे जिल्हास्तरावर आदेश देण्यात आले आहे.
तसेच आज रोजी जिल्ह्यातील सर्वच उपविभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांना हिस्ट्रीशीटर, निग्रणी बदमाश व दोन पेक्षा जास्त गुन्हे नोंद असणारे गुन्हेगार यांना एकत्र आणून त्याच प्रमाणे यवतमाळ उपविभागातील गुन्हेगारांना पोलीस मुख्यालय यवतमाळ येथे एकत्र जमवून त्यांना गुन्हेगारी पासून परावृत्त करण्या करिता मा. पो. अधीक्षक श्री कुमार चिंता यांनी स्वतः समुपदेशन केले.
तसेच यवतमाळ उपविभागातील ८७, पुसद उपविभागातील ५७, दारव्हा उपविभागातील ४२, वणी उपविभागातील २६, पांढरकवडा उपविभागातील २५ आणि उमरखेड उपविभागातील ४३ अशा एकूण २७९ हिस्ट्रीशीटर व निगराणी बदमाशांची पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली.
तसेच गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नये व प्रामाणिकतेची कास धरून स्वतः बरोबर समाजाचे विकासात हातभार लावावा याकरीता त्यांच्याकडून खालील प्रमाणे प्रतिज्ञा घेण्यात आली.
” आम्ही भारताचे नागरिक आहोत.. यापुढे कोणतेही गुन्हेगारी कृत्य करणार नाही.. तसेच कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभाग घेणार नाही.. माझ्याकडून कोणतेही गैर कृत्य घडणार नाही.. असे घडल्यास मी सर्वस्वी जबाबदार राहील.. “













