प्रहारचे आवाहन, नागपूर येथे शेतकऱ्यांचे आंदोलन

October 26, 2025

वणी : शेतकऱ्यांचे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. शेतकरी नेता शरद जोशी यांच्या अंगारमळ्याची माती कपाळाला लावून प्रहार जनशक्ती पक्षाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या न्यायाच्या लढ्याचा बिगुल वाजवला आहे. “शेतकऱ्यांचे मरण हेच शासनाचे धोरण” या घोषणेसह येत्या 28 ऑक्टोबर 2025 रोजी नागपूर येथे महा एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख, माजी आमदार बच्चुभाऊ कडू करणार आहेत.या मोर्च्यात जाहीरनाम्यातील वचनांची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे ठोस भूमिका मांडण्यात येणार आहे.

त्यातील प्रमुख मागण्या म्हणजे — राज्यात तात्काळ ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा, तसेच शेतीमालाला एम.एस.पी.सह 20 टक्के बोनस देण्यात यावा, याशिवाय इतर अनेक मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी जनशक्ती पक्षाची ठाम भूमिका आहे.या पार्श्वभूमीवर यवतमाळ उपजिल्हा प्रमुख मोबीन शेख यांनी वणी, झरी व मारेगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की, जाती-धर्म, पंथ-पक्ष यापलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एकत्र यावे. “28 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या या महा एल्गार मोर्चात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या आवाजाला बळ द्या,” असे भावनिक आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.या शासकीय विश्राम गृहात पार पडलेल्या परिषदेला शेतकरी संघटनेचे देवराव भाऊ धांडे, सतीश देरकर, प्रहारचे शहराध्यक्ष सय्यद अहेमद, जनार्दन टेकाम सह सचिव यांच्यासह प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.