नियमित वाचनाने व्यक्तीची स्वतंत्र ओळख निर्माण होते-पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर

October 30, 2025

वणी : वाचनाने मन व मस्तिष्क सुदृढ होते. त्यामुळे काय वाईट काय चांगले याचा निर्णय घेता येतो. जे जीवनामध्ये खूप आवश्यक आहे. अशा प्रकारे नियमित वाचनाने व्यक्तीची स्वतंत्र ओळख निर्माण होते. असे प्रतिपादन येथील ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी केले.

ते नगर वाचनालयात आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका संघचालक हरिहर भागवत हे होते. दरवर्षी नगर वाचनालयात महाराष्ट्रातील दर्जेदार साहित्यिक, विनोदी, स्त्री शक्ती विषयक विविध दिवाळी अंकांची खरेदी करून वाचकांना उपलब्ध करून देण्याच्या आधी वणीकरणा या दिवाळी अंकांचे अवलोकन करता यावे यासाठी दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

या प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर अतिथीसह उपस्थितांनी या अंकांचे अवलोकन करून आनंद व्यक्त केला.दोन दिवसाच्या प्रदर्शनानंतर दिनांक 26 ऑक्टोबर पासून 300 रुपये ना परतावा नोंदणी शुल्क देऊन 35 दिवाळी अंक वाचता येणार आहे. अध्यक्षीय भाषणात भागवत यांनी नगर वाचनालय वाचन संस्कृती वाढविण्यासाठी करीत असलेल्या उपक्रमाचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष विशाल झाडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार यांनी मेहनत घेतली.