टोलेबाज न्युज : रवि घुमे, मारेगाव
वणी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुका काँग्रेस पक्षातील अध्यक्षपदात कमालीचे परिवर्तन करून नवे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते वसंतराव आसुटकर यांची तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
काही दिवसापूर्वी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीसमोर ब्लॉक अध्यक्ष पदाच्या मुलाखती पार पडल्या यात एकमेव वसंतराव आसुटकर यांनी मुलाखत दिली होती. आसुटकर यांनी स्वाभिमानाने काँग्रेस पक्षात कार्य करून निष्ठावान व ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून तालुक्यात आपली ओळख अधोरेखित केली.
तूर्तास ते मारेगाव बाजार समितीचे संचालक, मार्डी वि. का. सह. संस्थेचे अध्यक्ष व मारेगाव इंदिरा स्मृती मंडळाचे अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहे. पक्षाने आता मारेगाव तालुका अध्यक्ष पदाची माळ आसुटकर यांच्या गळ्यात अर्पण केल्याने आगामी काळातील निवडणुका आणि पक्ष बळकटीचे तगडे आव्हान त्यांच्यासमोर आहे. येत्या पंधरवाड्यात तालुका कार्यकारिणीची निवड होणार आहे. दरम्यान, वसंतराव आसुटकर यांच्या अध्यक्ष पदाच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.













