*राज्याच्या उपमुख्यमंत्र्यानी शेतकऱ्यांप्रती केलेल्या अपमानकारक वक्तव्याचा संयुक्त किसान मोर्चाने वणीत केला जोरदार निषेध*

November 5, 2025

वणी: नागपुरच्या शेतकरी महाएल्गार आंदोलनाच्या रेट्यामुळे महाराष्ट्र सरकारने दि. 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली.परंतु दुसऱ्या दिवशी लगेच उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांनी शेतकऱ्यांविषयी “फुकट मागायची सवय बंद करावी, आम्ही अनेक वेळा कर्जमाफी दिली आहे, किती वेळा कर्ज माफ करणार आहोत, स्वतः कर्ज भरायची सवय लावावी” असे उद्गार काढले.

हे वक्तव्य शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणारे असून अत्यंत अन्यायकारक आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा आपल्या सरकारने 20% कमी भाव देऊन मागील पंधरा वर्षांत शेतकऱ्यांचे सुमारे 45 लाख कोटी रुपयांचे नुकसान केल्याचे आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण संस्थांच्या अहवालात नमूद आहे. याचा अर्थ, शेतकऱ्यांचे 45 लाख कोटी रुपये आपल्या सरकारकडे बाकी आहेत. तरीसुद्धा शेतकऱ्यांना “भीक मागणारे” म्हणून अपमानित करणे हे बेकायदेशीर व नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्य किसान सभा,शेतकरी संघटना व संभाजी ब्रिगेडने संयुक्तरित्या वणी येथील शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने आंदोलन करून उपविभागीय अधिकारी व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन उपमुख्यमंत्र्यावर कारवाई करण्याची याप्रसंगी शेतकरी नेत्यांनी मागणी केली.

या आंदोलनात महाराष्ट्र राज्य किसान सभेचे कॉ.अनिल घाटे,संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे,शेतकरी संघटनेचे देवराव धांडे, दशरत बोबडे यांचे नेत्रुत्वात गजानन ठाकरे, पंढरी मोहितकर, प्रेमनाथ मंगम,भाकपचे राजुर चिखलगाव जि.प.गटाचे उमेदवार कॉ. मुसाफिर देवनारायण राम, अथर्व निवडिंग यांचेसह शेकडो शेतकरी सहभागी होते.