शिवसेना (उबाठा) – मनसे युतीसाठी २५० इच्छुकांच्या मुलाखती संपन्न, राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला.

November 10, 2025

वणी प्रतिनिधि : राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची नांदी अखेर स्थानिक पातळीवर होताना दिसत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन्ही पक्षांनी एकत्र येत युती केली असून, या युतीसाठी आज, १० नोव्हेंबर रोजी, तब्बल २५० हून अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

वणीतील जगन्नाथ महाराज मंदिर, वरोरा रोड येथे दुपारी १२.०० वाजता या महत्त्वाच्या मुलाखती पार पडल्या. वणी नगरपालिकेत एक नगराध्यक्ष आणि २९ नगरसेवक अशा एकूण ३० जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. ठाकरे बंधूंच्या पक्षांची ही युती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्र येत असल्याने, या लढतीत मोठे राजकीय बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळवण्यासाठी दोन्ही पक्षाच्या इच्छुकांनी मोठा प्रतिसाद दिला.नगराध्यक्षपदासाठीही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

काही प्रभागात दोन जागांसाठी तब्बल १५ ते १७ इच्छुकांनी अर्ज सादर करून मुलाखती दिल्या, ज्यामुळे इच्छुकांमध्ये मोठी स्पर्धा असल्याचे स्पष्ट झाले.पक्षनिरीक्षकांच्या वतीने घेण्यात आल्या. यावेळी शिवसेनेचे (उबाठा) विद्यमान आमदार संजय देरकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या मुलाखतीस शिवसेना (उद्धव ठाकरे गटाचे) आमदार संजय देरकर, मनसेचे नेते राजू उंबरकर, मनसे महिला सेनेच्या राज्य उपाध्यक्ष अलका टेकाम, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे, मनसे महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा अर्चना बोदाडकर, विधानसभा संघटक सुनिल कातकडे, दिपक कोकास,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, गणपत लेडांगे, रमेश पेचे, धनंजय त्रिंबके, दिलीप काकडे, फाल्गुन गोहोकार, माजी नगराध्यक्ष प्रिया लभाणे, सुधीर थेरे, गोविंदराव थेरे, अंकुश बोढे,अजिंक्य शेंडे, राजू तुराणकर, विलन बोदाडकर, बंडू येसेकर, विनोद ढुमने, संतोष कुचनकार, शरद ठाकरे, प्रकाश पिंपळकर, मनीष बत्रा, राकेश वैद्य, सौ . सविता आवारी, ज्योती मेश्राम, मेघा तांबेकर, मयुर गेडाम, शंकर पिंपळकर शम्स सिद्दिकी, राहुल पानघाटे, लक्की सोमकुंवर, अहेमद रंगरेज, आशिष चतुर, अमर सातपुते, विकी कळसकर, सूरज पळसकर यांच्यासह शिवसेना – मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी यावेळी विजयाचा निर्धार व्यक्त केला आणि युतीमुळे वणी नगरपालिकेवर भगवा फडकवणार असल्याचा विश्वास दाखवला.
राज्याच्या राजकारणात ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे’ हे दोन्ही नेते एकत्र येणार का, याबद्दल चर्चा सुरू असतानाच, वणीमध्ये स्थानिक पातळीवर ही युती प्रत्यक्षात येत असल्याने राजकीय वर्तुळात याकडे विशेष लक्ष लागले आहे. वणीतील ही स्थानिक युती भविष्यात राज्याच्या राजकारणाला कोणती दिशा देईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.