ड्राय डेला दारूचा धिंगाणा ;दारूबंदी विभाग नेमका झोपला होता का..?

July 31, 2026

वणी : “अहो साहेब… ड्राय डे होता की दारू डे?” असा संतप्त सवाल आता वणीकर थेट दारूबंदी विभागाला विचारत आहेत. राज्य शासनाने ड्राय डे जाहीर करूनही शहरात अनेक ठिकाणी अवैध दारूची खुलेआम विक्री झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे “नेमकं दारूबंदी विभाग करतं तरी काय?” अशी संतप्त चर्चा शहरभर रंगली आहे.

अहो अधिकाऱ्यांनो… ड्राय डेच्या दिवशीच जर अवैध दारू सहज मिळत असेल, तर तुमच्या कारवाईचा धाक कुठे गेला? अवैध धंदेवाल्यांना कायद्याची भीतीच उरली नाही का? असे सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

शहरातील अनेक भागांत दिवस-रात्र अवैध दारू विक्री सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. “आम्ही तक्रारी करतो, पण कारवाई मात्र दिसत नाही,” अशी नागरिकांची नाराजी आहे. त्यामुळे काही जण ‘हप्ते’ आणि ‘चिरीमिरी’च्या जोरावर कारवाई टाळली जात असल्याचे आरोप करत असून, या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

दारूबंदी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनो… जर हे आरोप खोटे असतील, तर अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई करून नागरिकांचा विश्वास परत मिळवा. आणि जर कुणी अधिकारी दोषी आढळला, तर त्यालाही पाठीशी न घालता कठोर कारवाई करा, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

ड्राय डेच्या दिवशीही शहरात अवैध दारूचा व्यापार सुरू असल्याचे आरोप होत असतील, तर हा केवळ कायद्याचा प्रश्न नाही, तर शासनाच्या आदेशालाच खुलेआम आव्हान असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.