अजिंक्य शेंडे यांच्या पुढाकारातून तान्हा पोळ्यात शुध्द पाणी वाटप

वणी : वणी ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वणी शहरामध्ये धार्मिक असो किंवा सामाजिक कार्यक्रम असो, पक्षभेद न करता राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येऊन सहभागी होतात तर काही कार्यक्रमात सेवाभावी वृत्तीने नास्ता या पाणी वाटप करतात. शहरातील आंबेडकर चौक येथील मोठा हनुमान मंदिर परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवारी तान्हा पोळा निमित्त भव्य नंदी बैल पोळा भरविण्यात आला. या तान्ह्या पोळ्यात (शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाधिकारी अजिंक्य सुभाष शेंडे यांनी आलेल्या बालगोपाळांना शुद्ध पिण्याचे पाण्याच्या बाटल व पार्लेजी बिस्कीट चे वाटप केले. अजिंक्य शेंडे हे नेहमीच सामाजिक कार्यात भाग घेतात. त्यांनी या पाणी वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व बालगोपालांना दिल्या. पाणी वाटप कार्यक्रमात मनोज वाकटी, आकाश खंडाळकर, कारण क्षीरसागर, कुंदन पेंदोर, गौरव पांडे, गोलू सिडाम, श्रीकांत सुसकर आदींनी सहकार्य केले.

धक्कादायक…विहिरीत आढळून आला विवाहितेचा मृतदेह

वणी : तालुक्यातील कुरई येथे एका विवाहित महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना ही शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत घडली.

अविता विजय परसुटकार (अंदाजे वय 33), असे मृतक महिलेचे नाव आहे.

नेहमीप्रमाणे दिनांक 27 ऑगस्टला सौ.अविता व तिचा पती विजय हे शेतकामाकरीता गेले होते, दुपारी अडीज वाजेच्या दरम्यान शेत विहीरीमध्ये तिचा मृतदेह आढळून आला. मृत्यूचे कारण अद्याप कळले नाही. सदर घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखलहोऊन घटनेचा पंचनामा केला. व मृतदेह उत्तरीयतपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

मृतकाच्या पाठीमागे पती, तिन मुली व सासु असा बराच आप्त परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ए पी आय शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.

‘त्या’ अपघातातील इसमाचा मृत्यू

वणी : वणी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गणेशपुर नजीक वणी-मुकुटबन मार्गावर एका सायकलस्वार कामगाराचा ट्रक अपघातात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.महेंद्र सदाशिव देठे (४०) रा. रंगनाथ नगर, वणी असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. महेंद्र हे बांधकाम कामगार होते ते काम पाहण्यासाठी रंगनाथ नगर येथील आपल्या राहत्या घरुन सतिघाटावरून पुल पार करत गणेशपुर गावाकडे आपल्या सायकलने जात होते दरम्यान पळसोनी – मुर्धोनी फाट्याजवळ मागाहून येणाऱ्या एका ट्रक ची त्या सायकलस्वारास धडक बसली. या अपघातात महेंद्र देठे हे गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर महेंद्र देठे यांना उपचारासाठी वणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने महेंद्र देठे यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर केले मात्र वाटेतच जखमीचा मृत्यू झाला. याबाबत ट्रक चालकाविरुद्ध वणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

गाडीच्या डिक्कीतून दीड लाख रुपये लंपास

वणी : शहरात चोरीच्या घटना सतत घडत असून एका डीलरची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबवली.ही घटना २५ ऑगस्ट रोजी येथील प्रसिद्ध शेवाळकर परिसरात घडली.बंडू तुकाराम बानकर वय ५५, रा. गणेशपूर, छोरिया ले-आउट, वणी असं रोकड चोरीला गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. यांची दीड लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार नोंद केली आहे. प्राप्त माहितीनुसार दि. २५ ऑगस्ट रोजी बानकर हे मित्रासह एका बँके शाखेत गेले होते. तेथे त्यांनी १ लाख ५० हजार रुपयांची रोकड काढून आपल्या आयक्यूब इलेक्ट्रिक दुचाकीच्या डिक्की मध्ये ठेवली होती. दिवसभरात आपली कामे आटोपून सायंकाळच्या ३/४ वाजताच्या सुमारास राम शेवाळकर परिसरातील कार्यालयात गेले असता त्यांची बाहेर उभी ठेवून असलेल्या गाडीकडे नजर गेली, डिक्कीतील कागदपत्रे जमिनीवर अस्तव्यस्त आढळून आली. शंका आल्याने त्यांनी डिकी तपासली असता, रोकड नसल्याचे लक्षात आले.

शहरातील मुख्य नागरी समस्या तत्काळ दूर न केल्यास धरणे आंदोलन

वणी : शहरातील काही तातडीच्या नागरी समस्या वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयभाऊ देरकर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांचे प्रमुख उपस्थितीत शहर प्रमुख विनोद ढुमणे यांनी मुख्याधिकारी नगर परिषद वणी यांच्या निदर्शनास आणून देत नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या लक्षात आणून देत सदर समस्यावर तत्काळ कार्यवाही करणे संदर्भात शिष्टमंडळ घेउन चर्चा कऱण्यात आली.संपुर्ण वणी शहरात वीज, स्टोरेज क्षमता, भरपूर पाणी ऊपलब्ध असताना सुद्धा शहरात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे आपले विभागाला अलर्ट करून संपुर्ण शहराला तत्काळ पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करणे, इंदिरा गांधी चौक ते अग्रवाल कंट्रोल यांच्या  घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे कामाची सुरुवात करावी, इंदिरा गांधी चौक परिसरातील खुल्या नालीचे बांधकाम तात्काळ सुरु करण्यात यावे.शहरातील साई मंदीर, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत रस्ता दुभाजकात अती मोठी होणारी झाडे लावण्यात आली आहे, जी मोठे झाल्यानंतर एस टी बस, जड वाहतुकीची मोठी वाहने झाडांच्या फांद्या रस्त्यांवर आल्याने अपघाताचे कारण ठरू शकते अशी नियमबाह्य झाडे दुभाजकातून तात्काळ काढून त्या ठिकाणी निविदेतील नमूद झाडे लावण्या संदर्भात चर्चा कऱण्यात आली.हमीद चौक ते पंचशील चौक या दरम्यानचा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी तसेच ब्राह्मणी रोडवर विवेकानंद शाळेजवळ पाणी साचलेले असून शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना यामुळे मोठ्या प्रमाणात वरदळी साठी त्रास सहन करावा लागत आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात.दर रविवारी भरणारा आठवडी बाजार नियोजित जागेवर न भरता रस्त्यावर भरत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण केली जाते त्यामूळे तो नियमित जागेवर भरविण्यात यावा. तसेच संपूर्ण शहरांमध्ये कीटकनाशक फवारणी करून मच्छर मुक्ती अभियान राबविण्याची मागणी कऱण्यात आली, या संपूर्ण प्रश्नांची सरबत्ती भडिमार मुख्याधिकारी नगरपरिषद वणी यांच्यावर करण्यात आला वरील सर्व गंभीर बाबींवर तातडीने लक्ष घालून आवश्यक ती कार्यवाही सात दिवसाच्या आत करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. अन्यथा नगर परिषद आवारात धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे, जिल्हा समन्वयक सुधीर थेरे, वणी तालुका प्रमुख संतोष कुचनकर, तालुका संपर्कप्रमुख प्रकाश कराड, उप तालुका प्रमुख लुकेश्वर बोबडे, शहर प्रमुख विनोद ढुमणे, शहर संपर्कप्रमुख राजू तुराणकर, शहर संघटक मनीष बत्रा, अजय चन्ने शहर सचिव, उपशहर प्रमुख राजीव पाटील, राहुल कोलते, आनंद घोटेकर, प्रसिद्ध प्रमुख सांकेत भुजबळ, प्रेमा धानोकर उपसरपंच भांडेवाडा, राजु इड्डे तालुका सचिव , अरविंद राजूरकर उपतालुका प्रमुख, सुभाष कुमरे, विजय ठाकरे, राजू झाडे, भारत डंबारे,यादव आसुटकर व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

कॉग्रेस च्या चक्काजाम आंदोलनाचा धसका, वेकोली प्रशासन नमली

वणी : वेकोलि खाण परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्था व इतर मूलभूत समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसतर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सोमवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजल्यापासून उकणी येथील खाण रोडवरील बसस्टॉपजवळ हे विराट चक्काजाम आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन तब्बल साडेतीन तास चालले. आंदोलनात सुमारे 300 पेक्षा अधिक आंदोलक सहभागी झाले होते. वेकोलिच्या आश्वासनानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले. काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले.

सकाळी 6 वाजता उकणी येथील खाण रोडवरील बसस्टॉपवर लोकांनी गोळा होण्यास सुरुवात केली. काही वेळातच शेकडो आंदोलक घटनास्थळी गोळा झाले. दरम्यान वेकोलिचे कर्मचारी देखील आंदोलनात सहभागी झालेत. त्यामुळे आंदोलकांची संख्या 300 पेक्षा अधिक झाली. यावेळी वेकोलि प्रशासनाविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. उकणी खाणीकडे जाणारा रस्ता अडवण्यात आल्याने या मार्गावर वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली.

आंदोलनात काँग्रेसचे प्रमोद वासेकर, पुरुषोत्तम आवारी, अशोक चिकटे, वासूदेव विधाते, सुनील वरारकर, सतीश खाडे, बंडू बोंडे, बंडू गिरटकर, सुरेश ढपकस, प्रभाकर खोब्रागडे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. परिसरातील गावातील रहिवासी, वेकोलि कर्मचारी, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलन यशस्वी झाल्याने गावकरी व वेकोलि कर्मचारी समाधान व्यक्त करण्यात आले.

आज उकणी येथे काँग्रेसचे चक्काजाम आंदोलन

वणी : उकणी, निलजई इत्यादी खाण परिसरातील गावातील रस्त्यांची दुरवस्था आहे. रस्त्याची दुरुस्ती तसेच जमीन संपादन, रोजगार, शैक्षणिक सुविधा, शेती नुकसान भरपाई इत्यादी मागण्यांसाठी काँग्रेसतर्फे सोमवार, दि. 25 ऑगस्ट 2025 रोजी वेकोलि प्रशासनाविरोधात चक्काजाम आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे. सकाळी 6 वाजता उकणी खाण रोडवरील बसस्टॉप उकणी येथे सकाळी 6:00 वाजेपासून हे आंदोलन सुरु होणार आहे. उकणी जवळ उकणी, निलजई, जुनाड, नायगाव, कोलारपिंपरी येथे कोळसा खाण आहे. या खाण परिसरात उकणी, पिंपळगाव, जुनाड, बोरगाव, भालर, निलजई, सुंदरनगर, निवनी, बेसा, तरोडा, बेलोरा, नायगाव, कोलारपिंपरी इत्यादी गावे आहेत. या भागातील रस्ते वेकोलिच्या ओवरलोड ट्रकमुळे पूर्णपणे खराब झाले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वेकोलि कामगारांना प्रवास करणे धोकादायक व अवघड झाले आहे. शिवाय या मार्गावरून खराब रस्त्यामुळे सातत्याने अपघात होत आहे. यात अनेकांना जीव देखील गमवावा लागला तर अनेक लोक जखमी झालेत. या आहेत प्रमुख मागण्या.खाण परिसरात उकणी, पिंपळगाव, जुनाड, बोरगाव, भालर, निलजई, सुंदरनगर, निवनी, बेसा, तरोडा, बेलोरा, नायगाव, कोलारपिंपरी गावांचे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत. उकणी गावातील उर्वरित 15% जमीन तात्काळ संपादित करावी, गावकऱ्यांना वाढीव मोबदला आणि वणी जवळ पुनर्वसन करावे. स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्यावे, भांदेवाडा खदानातील डोजर, पीसी, डम्पर ऑपरेटरांना पुन्हा नियुक्त करावे. उकणी, पिंपळगाव, जुनाडा, प्रगती नगर येथील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त बस सेवा तर उकणी गावासाठी स्वतंत्र स्कूल बस सुरू करावी. कोळशाच्या धुळीमुळे झालेले नुकसान भरपाई म्हणून शेतक-यांना मोबदला द्यावा. आंदोलनात सर्व काँग्रेस कार्यकर्ते, नेते, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवा दल, एनएसयुआय, अल्पसंख्यांक, आदिवासी सेल, काँग्रेस समर्थक व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संजय खाडे यांनी केले आहे.

खाण परिसरातील गावातील रस्त्यांवरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. वेकोलि प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असतानाही, गेल्या 10-15 वर्षांपासून या रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही. वेकोलि प्रशासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन होत असून हा लढा न्याय मिळे पर्यंत सुरु राहणार.

– संजय खाडे, सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस

एक कॉल, अन हरवलेला मोबाईल “त्या” महिलेला मिळाला परत

वणी : दिनांक २३/०८/२०२५ रोजी तान्हा पोळा सण असल्याने शासकीय मैदान वणी येथे बालगोपालांचा नंदीबैल सजावट कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता, सदर कार्यक्रमामध्ये वणी परिसरातील बरेचसे बालगोपालांनी त्यांचे नंदीबैल सजावट करून सहभागी झाले होते, सदर कार्यकम पाहण्याकरीता व बालगोपालांचे नंदीबैल पाहण्या करीता वणी परिसरातील बरेचसे लोक शासकीय मैदान वणी येथे जमले होते त्यापैकी सौ. राखी रामेश्वर कांबळे रा. पंचशील नगर वणी हे सुद्धा त्यांचे कुटुंबीयां सह शासकीय मैदान वणी येथे आले असता त्यांना मैदानामध्ये सायंकाळी ०६/३० वा. चे सुमारास ०१ बेवारस मोबाईल मिळुन आला होता. करीता त्यांनी सदरचा मोबाईल आपले ताब्यात ठेवुन बराच वेळ सदर ठिकाणी मोबाईल धारकाची प्रतिक्षा केली परंतु कोणतीही व्यक्ती सदर मोबाईल बाबत मालकी हक्क सांगण्याकरीता उपस्थित झाले नाहीत, करीता सदर महीला यांनी त्यांना मिळालेला मोबाईल हा मुळ मालकाला परत मिळावा या प्रामाणीक हेतुने सायंकाळी ०७/३० वा.चे सुमारास पोलीस स्टेशन वणी येथे स्टेशन डायरी कर्तव्यावर असलेले पो. हे कॉ विकास धडसे व ललीत नवघरे यांचेकडे सुपुर्द करून त्यांना सर्व हकीकत सांगीतली, परंतु सदरचा मोबाईल हा पॅटर्न लॉक असल्याने त्याचा पासवर्ड उघडणे शक्य नव्हते, तसेच सदर मोबाईल वर बराच कालावधी लोटुन सुद्धा कोणाचाही कॉल वगैरे आला नसल्याने सदरचा मोबाईल हा नेमका कोणाचा आहे याचा बोध लागुन येत नव्हता. शेवटी रात्री ०९/०० वा.चे सुमारास सदर मोबाईल वर सौ. पुजा संकेत मेश्राम रा. रंगनाथ नगर वणी यांचा फोन आला व त्यांनी सदरचा मोबाईल हा त्यांचा असल्याचे सांगुन मोबाईल बाबत पुरावे सादर केले व ते एका खाजगी रूग्णालया मध्ये कर्तव्यावर असुन मोबाईल मध्ये महत्वाचे कागदपत्रे व इतर महत्वाची माहीती असल्याचे नमुद केले.आज दिनांक २४/०८/२०२५ रोजी मिळुन आलेल्या मोबाईल धारक हे कर्तव्यावर असल्याने त्यांनी त्यांचे पती श्री संकेत नामदेव मेश्राम रा. रंगनाथ नगर वणी यांना पोलीस स्टेशन वणी येथे पाठविले त्यांचे कडुन सदर मोबाईल बाबत्त संपुर्ण शहानिशा करून सदरचा मिळुन आलेला मोबाईल सौ. राखी रामेश्वर कांबळे रा. पंचशील नगर वणी यांचे हस्ते श्री. संकेत नामदेव मेश्राम रा. रंगनाथ नगर वणी यांना सुपुर्त करण्यात आला आहे.सौ. राखी रामेश्वर कांबळे रा. पंचशील नगर वणी यांनी प्रामाणीक पणाचा परिचय देवुन समाजाप्रती असलेली आपुलकीची भावना जोपासुन कोणताही मोह न बाळगत्ता मिळुन आलेला मोबाईल पोलीस स्टेशन वणी येथे आणुन दिल्याने मुळ मोबाईल धारकाला परत करणे शक्य झाले आहे, तसेच मोबाईल धारकांना त्यांचा मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी सौ.राखी रामेश्वर कांबळे रा. पंचशील नगर वणी यांचे आभार माणुन आपल्या संवदेना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने भव्य राज्यव्यापी कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकरी परिषद

वणी : महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने वणी येथे 7 सप्टें. ला दु.12 वाजता शेतकरी मंदीर येथे राज्यव्यापी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परीषदेला मार्गदर्शक म्हणुन किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष काॅ.राजन क्षिरसागर (परभणी), प्रसिद्ध अर्तज्ञथ डाॅ.श्रीनिवास खांदेवाले(नागपूर),शेतकरी नेते काॅ.तुकाराम भस्मे (अमरावती),राज्याध्यक्ष अॅड.हिरालाल परदेशी (धुळे),राज्यसचिव काॅ.अशोक साेनारकर(अमरावती) आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहे. परिषदेसाठी सर्व शेतकऱ्यांना क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या लढाऊ परंपरेने एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या परिषदेचे मुख्य मुद्दे: 1) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान हमी भावाचा कायदा करावा. 2) कापूस व सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू करणे आणि शेतकऱ्यांना उत्पादनात हिस्सेदारी देणे. 3) आयात-निर्यात धोरण शेतकरी हिताच्या दृष्टीने ठरवणे. 4) पीक विमा कंपनी सरकारी असावी व नियम स्थानिक नैसर्गिक परिस्थिती पाहूनच ठरवावे. 5) सरकारी खरेदी केंद्रे वेळेत व पूर्ण क्षमतेने सुरू करणे, खुल्या बाजारातील लूट रोखणे. 6) जंगली जनावरांनी केलेल्या नुकसानीची तातडीने भरपाई करण्याचा कायदा करण्यात यावा.

बोटोणीच्या बहूचर्चीत रुग्णालयात रुग्णांची फसवणुक होत असल्याची तक्रार

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील बोटोणी या पेसा गावात जनकल्याण समीती द्वारा ता. १० जुलै ला उदघाटन करून एक सेवाभावी रुग्णालय सुरु करण्यात आले. रुग्णालय सुरु असून दररोज कमिधिक ६०-७० रुग्ण उपचार घेत असल्याचा व ग्रामीण भागात मोफत सेवा सुरु असल्याचा दावा संस्थाध्यक्षा कडून केला जात आहे.
मात्र हे ग्रामीण रुग्णालय अवैध आहे,व या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची फसवणुक होत असुन येथील उपचाराने रुग्णावर दुष्परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याच्या आशयाची तक्रार शामदादा कोलाम ब्रिगेडच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचे कडे करण्यात आली आहे.
मारेगाव आरोग्य विभागाच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या बोटोणी या पेसा गावात अटलबिहारी वाजपेयी ग्रामीण रुग्णालय असे नाम फलक लावुन रुग्णालय सुरु करण्यात आले आहे.हे रुग्णालय शासन मान्य तथा अनुदानित तत्वावर असल्याचा मोठामोठा गाजावाजा करुन पदभरतीच्या मुलाखती घेतल्या होत्या. या मुलाखती नंतर मोठ्या प्रमाणात आर्थीक उलाढाल झाल्याची चर्चा बोटोणी सह तालुक्यात सुरु आहे. मात्र प्रदीर्घ कालावधी नंतर जाहिराती प्रमाणे पदभरती करण्यात आली नाही. त्यामुळे सुशिक्षीत बेरोजगारांची फसवणुक झाली आहे. या अवैध रुग्णालयाची तक्रार यापुर्वी करण्यात आली आहे. संस्था अध्यक्ष व इतर सहकाऱ्यांची चौकशी करुन रुग्णांची होत असलेली फसवणुक थांबवावी अन्यथा ३सप्टेंबर पासून उपोषण करण्यात येईल असा ईशारा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना दिलेल्या तक्रार अर्जातुन शामदादा कोलाम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुमरे यांनी दिला आहे. त्यामुळे प्रकरण कोणते वळण घेईल या उत्सुकतेत परिसरातील जनतेच्या नजरा लागल्या आहे.