शाळेच्या पाडल्याची खोट्या तक्रार कर्त्यांची पोलखोल

वणी : सविस्तर खुलासा……………या तीन वर्गखोल्या निर्लेखन करण्याची मंजुरात 1)मा.शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यवतमाळ यांचे पत्र क्रमांक /यजीप/शिवी/प्राथ/वशि/2120/2025 दिनांक 18/07/2025 ला या आदेशानुसार दिली आहे.
2.) तसेच मा.गटविकास अधिकारी,पंचायत समिती वणी यांनी पसव/वि अ(सां)/निर्लेखन/बानी/272/2025 दिनांक 30/07/2025 या आदेशानुसार वर्गखोल्या निर्लेखन करण्याचा आदेश सरपंच व सचिव ग्राम पंचायत यांना दिला आहे.
3)मा.ग्रामपंचायत विरकुंड यांनी मासिक सभेत वर्गखोल्या पाडण्याचा ठराव मंजूर केला.ठराव क्रमांक 7 सभा दिनांक 29/8/2025
4)मा.शाळा व्यवस्थापन समिती, नवेगाव विरकुंड यांनी सुद्धा मासिक सभेत 3 वर्गखोल्या नियमानुसार पाडण्याचा ठराव घेतलेला आहे.
5) मा.सरपंच व सचिव ,ग्रामपंचायत विरकुंड यांनी 3 वर्गखोल्या नियमानुसार पाडण्याचे काम श्री.पियुष चव्हाण यांना दिले.
6) वर्गखोल्या पाडल्या नंतर मा.सरपंच व सचिव ,ग्रामपंचायत विरकुंड यांनी वर्गखोल्या नियमानुसार पाडल्या असल्याचे माहिती चे पत्र मा.गटविकास अधिकारी,वणी यांना दिले.

दिनांक 22/9/2025 ला .शासन नियमाचे अधीन राहून वरील प्रमाणे पूर्ण प्रक्रिया पार पाडूनच नियमानुसार शाळेच्या 3 वर्गखोल्या निर्लेखीत (पाडल्या) आहेत.यात कोठेही हयगय झालेली नाही. मागील 2 ते 3 वर्षांपासून या जीर्ण वर्गखोल्या पाडण्याचे ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती कडून नियमानुसार प्रस्ताव पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषद कडे गेले होते त्या नुसारच नियमानुसार वरील सर्व प्रक्रिया झालेली आहे.आपल्या शाळेच्या जुन्या जीर्ण वर्गखोल्या झाल्या होत्या, त्यात भिंती मध्ये भेगा पडल्या होत्या , त्यात अनेकदा साप व इतर कीटक निघत होते तसेच या खोल्या धोकादायक झाल्या होत्या , त्यामुळे मुलांना बसण्यास या खोल्या धोकादायक होत्या त्यामुळे इतर गावात जश्या छान नवीन शाळेच्या खोल्या बांधकाम होत आहे तसे आपल्याही शाळेत व्हावे म्हणून आपल्या शाळेतील उत्साही शिक्षक श्री.देवेंद्र बच्चेवार सर यांनी स्वतः च्या खर्चाने अनेक चकरा यवतमाळ ला मारून सर्व अधिकारी यांना भेटून या वर्गखोल्या पाडण्याचे प्रस्ताव मंजूर करून आणले.

त्यानंतर ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती च्या पुढाकारात नियमानुसार या 3 वर्गखोल्या पाडण्यात आल्यात.या वर्गखोल्या पाडण्याचे खर्चाचे इस्टीमेट पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध आहे.वर्गखोल्या पाडण्याकरिता शासनाकडून कोणताही आर्थिक निधी मिळत नसतो.तर तो खर्च या वर्गखोल्याचे निघणारे सामान विकून भागवायचा असतो त्यात रक्कम कमी पडल्यास ग्रामपंचायत नी उर्वरित रक्कम भरपाई करून द्यायची असते व या सर्व सामानाची विल्हेवाट ही नियमानुसार लावण्याचे अधिकार ग्रामपंचायत ला आहे.

हे सर्व शासन नियम आहेत.त्यानुसार इस्टीमेट पेक्षा जास्त खर्च पाडण्यासाठी लागणार होता त्यामुळे इस्टीमेट आहे तेवढया खर्चातच या वर्गखोल्या पाडाव्यात व त्या बदल्यात टिन पत्रे, लोखंडी सामान , लाकडी सामान व इतर मटेरियल ठेकेदाराला देण्याचे करारानुसार ग्रामपंचायत ने ठरवले होते.जास्तीचे एकही पैसे ठेकेदाराला दिले नाहीत. वर्गखोल्या च्या निघालेल्या समानातच हे सर्व काम श्री.पियुष चव्हाण ठेकेदार यांचे कडून करून ग्रामपंचायत ने करून घेतले. आताही शाळेत पडून असलेल्या मटेरियल ची मालकी ठेकेदार यांची आहे. या सर्व कामात शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचा काहीच सहभाग नसून हे सर्व काम करण्याचा अधिकार मा.गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत ला दिल्याने ग्रामपंचायत ने नियमानुसार सर्व कार्यवाही पूर्ण केली.

तरीपण कोणत्याही प्रकारची पूर्ण माहिती न घेता गावातील काही लोकांनी या कामा बाबत निरर्थक आक्षेप घेऊन शाळेमध्ये जाऊन विनाकारण काहीही चूक नसताना तेथील मुख्याध्यापक व शिक्षकांना त्रास दिला.ही बाब अत्यंत निंदनीय आहे.तसेच याच काही गावातील लोकांनी मा.गटविकास अधिकारी वणी यांचे कडे तक्रार नेली असता गटविकास अधिकारी साहेबानी वरील सर्व कामे ही नियमानुसार झाली आहे असे ठणकावून सांगितले. त्यामुळे विनाकारण ग्रामपंचायत व शाळेला बदनाम करण्याचा काही लोकांचा मानस असून ते आपल्या स्वतःचे अस्तित्व दाखवण्याचा गैर हेतूने नाहक गावाची बदनामी करत आहेत. तरी सर्व ग्रामस्थांनी हा खुलासा वाचून व या सोबत असलेले सर्व आदेश पाहून खात्री करावी व गावाची बदनामी करणाऱ्यांचे षडयंत्र हाणून पाडावे.
नवीन वर्गखोल्या मंजूर करून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो

बोर्डा गावात देशी दारूचा महापूर

वणी वरून बोर्ड हे गाव 20 किमी अंतरावर आहे लगेचच बोर्डा गावाला लागून विकुली ची मोठी खदान आहे. मुळात घोंसा गाव असून तिथं दारूचे शासकीय दुकान आहे तिथून बोर्डा ह्या गावात दोन अंकी संख्येने देशी विदेशी दारू सर्रास दळणवळण होते गावात देशी दारूचे कोणतेही परवाना नसताना काही गुंड पूर्तीचे टपुरे भामट्यांनी मोठ्या प्रमाणावर देशी विदेशी दारूचे दुकान आपल्या राहत्या घरी मोठ्या प्रमाणावर थाटले आहे.

परंतु अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने बोर्डा गावातील देशी विदेशी दारूचे दुकानदार सर्रास चालू असून गावातील महिला व शाळकरी मुलींना रस्त्याने येणे जाण्याकरिता प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे आहे. दोन दिवसा पूर्वी काही गाव गुंड यांनी चपटी ढोपसून रस्त्याने येत असलेल्या एका इसमाला जाणून बुजून पकडून लाता बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

सदर इसम हा वीरकुंड नवेगाव गावाचा असून त्याची तब्येत अतिशय गंभीर स्वरूपाची आहे असे कळले असून याला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील माननीय जिल्हा पोलीस अध्यक्ष साहेब यांनी त्वरित लक्ष देऊन बोर्डा गावातील देशी-विदेशी दारूचे अवैध्य दुकान थाटलेल्या लोकांवर कडक कारवाई करून दुकान त्वरित बंद करावी अशी मागणी गावातील महिला व नागरिकांची असून बंदन झाल्यास आंदोलन करण्याच्या इशारा दिला आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती शिक्षक संघटनेची बैठक संपन्न

वणी : दिनांक २४सप्टेंबर२०२४ला मुंबई येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती शिक्षक संघटनेची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली.
या बैठकीस राज्यातील अनेक शिक्षक संघटनांचे राज्याध्यक्ष, राज्य सचिव व प्रतिनिधी उपस्थित होते.या सभेतील प्रमुख विषय
◼️टीईटी परीक्षा दोन वर्षांत उत्तीर्ण होण्याबाबत न्यायालयाचा निर्णय सर्वांवर बंधनकारक आहे.
◼️ जर परीक्षा पास झाले नाही तर सक्तीने सेवानिवृत्त व्हावे लागेल.
◼️ या निर्णयाचा फेरविचार व्हावा म्हणून शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी.
👉 शासनाने 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत पुनर्विचार याचिका दाखल केली नाही तर
📌 दि. 4 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षकांचा मूक मोर्चा काढण्यात येईल.
📢 सर्व जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी आजपासूनच मूक मोर्च्याची तयारी करावी.
🗣️ येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील शिक्षक संघटनांच्या बैठका घेऊन आंदोलनाचा संदेश सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचवावा.
✊ एकजूट करून वज्रमूठ बांधण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
⚖️ कायदेशीर चर्चा :
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या वतीने मा. उच्च न्यायालयाचे सीनियर ॲड. माननीय सुरेश पोकळे यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करण्यात आली.
त्यानंतर ठरल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री व मुख्य सचिव – महाराष्ट्र शासन यांना निवेदन सादर करण्यात आले.
केशवराव जाधव (राज्याध्यक्ष),
देविदास बसवदे (सल्लागार),
प्रसाद पाटील राज्य संघटक ,
साजीद निसार अहमद (राज्य कोषाध्यक्ष)
युवराज पोवाडे (राज्य उपाध्यक्ष)
चिंतामण वेखंडे (राज्य संघटक)
यादव पवार (राज्य कार्यालय चिटणीस)
विकास खांडेकर (राज्य सरचिटणीस)
भरत शेलार (राज्य कार्याध्यक्ष)
प्रसाद अनंत म्हात्रे (राज्य सरचिटणीस),वसंत सदानंद मोकल पुरोगामी शिक्षक संघटना रायगड जिल्हाध्यक्ष
तथा प्रतिनिधी सदस्य
पुरोगामी प्रा. संघटना
सुरेश रामराव खरात
चंद्रकांत केशवराव दामेकर
व इतर पदाधिकारी उपस्थित असल्याची माहित महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष मनिष राठोड, यवतमाळ जिल्हा सरचिटणीस आनंदकुमार शेंडे यांनी दिली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांनी मूक मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन ही करण्यात आले.

वीज कोसळून बैलाचा मृत्यू; शेतकरी किरकोळ जखमी

मारेगाव:तालुक्यातील श्रीरामपूर (कुंभा) येथे आज दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोज शुक्रवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास वीज कोसळून एक बैल जागीच ठार झाला, तर शेतकरी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली.

गोपाळ मारोती शेंडे (वय ५५, रा. कुंभा) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. शेंडे हे नेहमीप्रमाणे आपल्या श्रीरामपूर (कुंभा) येथील गट क्रमांक ३ मधील शेतात बैल चारण्यासाठी गेले होते. दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. याच दरम्यान शेंडे यांच्यावर वीज कोसळली. यात त्यांचा एक बैल (अंदाजे किंमत १ लाख रुपये) जागीच मृत झाला.

घटनेत शेंडे हे सौभाग्याने बचावले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती होताच तलाठी कमलेश अनिल सुरावार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बस चालकाला शिवीगाळ करत मारहाण.

वणी : आज दिनांक २६/०९/२०२५ रोज सकाळी सुमारे ६:१५ वाजताचे दरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वणी आगारातील बस क्रमांक MH 40 AQ 6062 ची बस शालेय विद्यार्थी आणण्यासाठी बोर्डा गावात जात असताना, विरकुंड ते बोर्डा या मार्गावर एका शेताजवळील रोडवर समोरून येणाऱ्या मोटरसायकल चालकाने त्याला अडथळा आणला.

बस चालकाने रस्ता दिला असता, मोटरसायकल चालकाने समोरून न जाता बस चालकावर फुकटची नौकरी लागल्याचा आरोप करत शिवीगाळ केली. त्यानंतर मोटरसायकल चालकाने बस चालकाचा कॉलर पकडून बस बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बसचा वाहक संजय नान्ने मदतीला धावून आला असता, मोटरसायकल चालकाने लाकडी काठीने बस चालकाच्या उजव्या खांद्यावर मारहाण केली.

मोटरसायकल चालकाचा क्रमांक MH 29 BW 8150 असून, त्याचे नाव पायघन रा. बोर्डा असे असून त्याने शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार फिर्यादीने पोलिस ठाण्यात दिली आहे.
फिर्यादी च्या जबानी तक्रारीवरून संबंधित युवकावर बीएनएस च्या कलम 132, 121 (1), 352 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वणी पोलीस स्टेशन चे सपोनि निलेश अपसुंदे करत आहे.

रंगनाथ स्वामी ना. प. संस्थेच्या वतीने उद्या शनिवारला सभासद मेळावा

सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण सभासद मेळाव्याचे उदघाट्क आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंगनाथ स्वामी ना. सह. पत संस्थेचे अध्यक्ष अँड. देविदासजी काळे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील तर राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष राजूदास जाधव हे प्रमुख अतिथी असतील.

शनिवारला दुपारी १२. ३० वाजता सुरु होणाऱ्या सभासद मेळाव्यास उपविभागातील मान्यवर तथा सभासदांनी प्रामुख्याने उपस्थित राहण्याचे आवाहन पतसंस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर, संचालक परिक्षित एकरे, सुधीर दामले, हरीशंकर पांडे, रमेश भोंगळे, सुरेश बरडे, अँड. घनश्याम निखाडे, डॉ. भूपाळराव पिंपळशेंडे, चिंतामण आगलावे, पुरुषोत्तम बद्दमवार, उदय रायपुरे, लिंगारेड्डी अड्डेलराव, अरविंद ठाकरे,सुनील देठे, छायाताई ठाकुरवार, निमाताई जिवणे, मुख्य. कार्य. अधिकारी संजय दोरखंडे,शाखा व्यवस्थापक संतोष घुगुल यांनी केले आहे.

मार्डी येथील उभाठाचे उपोषण तुर्तास मागे -फंड नको शेतमालाला योग्य भाव द्या-आ.संजय देरकर

पावसाच्या अघोरी रुपड्यानं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं असतांना शेतीवाडया सहित वस्त्यांचही नुकसान होऊन शेतकरी मेटाकुटीस आला. मात्र सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्या ऐवजी जिल्हा वगळला होता. सरकार विरोधकांना फंड देत नाही,चालेल आम्हाला फंड नको तर शेतकऱ्यांना त्याच्या मालाला योग्य भाव द्या असे प्रतीपादन वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी मार्डी येथील उपोषण मंडपात उपस्थीत शेतकऱ्यां समोर बोलतांना केले.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे तालुका शाखा मारेगावच्या वतीने मार्डी येथे तीन दिवसा पासून विविध मागण्यासाठी उपोषण सुरु होते. या समस्या मध्ये ओला दुष्काळ जाहीर करणे, रस्ते खड्डेमुक्त करणे, विजेचा लंपडावा पासून मुक्ती, १३२ के.व्ही.सबस्टेशन सुरु करणे,अवैध व्यवसाय बंद करणे इत्यादी मागण्याचा समावेश होता.सलग तीन दिवस उपोषण करून तिसऱ्या दिवशी उपोषणाची सांगता करण्यात आली.

दरम्यान आ.देरकर यांनी उपोषण मंडपात भेट देऊन सबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चे अंती उपोषणकर्त्याचे लेखी आश्वासनावर समाधान झाल्या नंतर आ.देरकर यांचे हस्ते उपोषण कर्त्यांना सरबत पाजुन उपोषण सोडले. यावेळी तहसिलदार उत्तम निलावाड, मारेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्क ठाणेदार विक्की जाधव, विद्युत विभागाचे अभियंता शामसुंदर कुर्रा, उप अभियंता नरेंद्र खटारे,जिल्हा परिषदेचे अभियंता संजय शिंदे,यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

मार्डी येथील बाजार चौकात बेमुदत उपोषणास बसलेल्या आंदोलनकर्त्यां मध्ये तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुटे, सचिव दिवाकर सातपुते, संपर्क प्रमुख सचिन पचारे, उपतालुका प्रमुख विजय अवताडे,माजी खरेदी विक्री उपाध्यक्ष शरद ताजणे या पाच पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.यावेळी आ.देरकर यांच्या सोबत शिवसेना नेते,प्रशांत पाचभाई,जिल्हा प्रमुख संजय निखाडे,विधानसभा प्रमुख सुनिल कातकडे,जिल्हा संघटक सुधिर थेरे,उप जिल्हा संघटीका सरपंच डिमनताई टोंगे,नगराध्यक्ष डॉ.मनिष मस्की सोबत होते. लेखी आश्वासनाची पुर्तता न झाल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा ईशारा देऊन उपोषण मागे घेण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचा बहुजनसासह एल्गार

मारेगाव बदकी भवन येथून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.निरज वाघमारे, वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांनी केले. हजारो महिला पुरुषांची उपस्थिती असलेल्या मोर्च्यात महाविहार बौद्ध भिक्षुच्या ताब्यात द्या.. सनातनी व्यवस्थेतून मुक्तता करा, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा कोरा करा, मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा आदी मागण्या आणि घोषणा करीत हजारो मोर्चेकरी मारेगाव तहसील कार्यालयात धडकले.

मेळाव्यात विविध सामाजिक, धार्मिक आणि शेतकरी विषयक प्रश्नांवर चर्चा झाली. त्यानंतर तहसीलदार मार्फत प्रशासनास मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. येथे सरकारच्या तुघलकी धोरणाचा निषेध करीत प्रहार करण्यात आला.

यावेळी वणी – मारेगाव तालुक्यातील पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
दरम्यान, महाबोधी विहार बौद्ध धर्मियांचे पवित्र स्थान असलेले महाविहार अन्य धर्मियांच्या ताब्यात का ? सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी बांधल्या गेलेले जगभरातील समस्त बौद्धाचे पवित्र श्रद्धास्थान आणि प्रार्थनास्थळ असलेल्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट असलेल्या बोद्धगया येथील महाबोधी विहारास सनातनी व्यवस्थेतून मुक्तता कधी मिळणार? हा प्रश्न कित्येक वर्षांपासून विचारल्या जात आहे.गेल्या अनेक महिन्यापासून विविध अडचणी व अडथळ्यावर मात करून भारत व जगभरातील भिखुंन्नी विहाराच्या आंदोलनाचा लढा उभारला आहे

यवतमाळ पोलिसांतर्फे आदर्श दुर्गा उत्सव स्पर्धा ऑपरेशन प्रस्थान

यवतमाळ पोलिसांच्या वतीने दुर्गा उत्सवास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्रोत्साहन बक्षीस देण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून, नागरिकांच्या सहकार्याने दीर्घ उत्सव सुरक्षित पार पडावा व शांत व शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखत दुर्गा उत्सवाची सांगता व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविल्या जात आहे. यासाठी पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता यांच्या नेतृत्वात पार पाडण्याची ही संकल्पना आहे

1.दुर्गा स्थापना व विसर्जन मिरवणूक डी. जे. मुक्त्त असावी -15 गुण

2.पारंपरिक वाद्यांचा वापर -05 गुण

3.रहदारीस अडथळा नसावा -10 गुण

4.अमली पदार्थ, दारू व नशा यावर निर्बंध -10 गुण

5.सामाजिक उपक्रम (रक्तदान, ओरोग्य शिबीर, वृक्षारोपण )-10 गुण

6.मंडळ परिसर स्वच्छ व सी. सी. टीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था -10 गुण

7.जेष्ठ नागरिक व महिलांचा सहभाग -10 गुण

8.शासकीय योजनेचा प्रचार व प्रसार -10 गुण

9.सामाजिक संदेश देणारे देखावे -10 गुण

10.पर्यावरपूरक साहित्याचा वापर -10 गुण

उद्या २५ ला मारेगावात वंचितचा ‘आक्रोश मोर्चा’

​मारेगाव येथील “बदकी भवन” मंगल कार्यालयाचे भव्य सभागृहात २५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते समाजाच्या सध्याच्या स्थितीवर चिंतन करतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ‘संघटित व्हा’ या संदेशाची आठवण करून देत, समाजाने कशा प्रकारे एकजुटीने काम केले पाहिजे, यावर विचारमंथन होईल. हा मेळावा केवळ एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसून, समाजाला नवी दिशा देणारा आणि त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा एक महत्त्वाचा टप्पा असेल.

​मेळाव्यानंतर, समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे. हा मोर्चा मारेगाव तहसील कार्यालयावर धडक देईल आणि प्रशासनाला निवेदन सादर करेल. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांचे सह जिल्हा पदाधिकारी करणार आहेत. समाजाचा आक्रोश आणि मागण्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे, हे या मोर्चाचे उद्दिष्ट आहे.

प्रमुख मागण्या…

१) महाबोधी महाविहार
बौद्धांच्या ताब्यात द्या.
बौद्ध धर्मियांसाठी सर्वात पवित्र स्थळ असलेल्या बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन आजही हिंदू धार्मियांचे ताब्यात आहे. त्याचे हिंदूकरन केल्या जात आहे आणि ते पवित्र स्थळ अजूनही बौद्ध धर्मियांच्या पूर्णपणे नियंत्रणाखाली नाही. त्यामुळे, या महाबोधी महाविहाराचा कारभार तात्काळ बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावा, महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशी तीव्र मागणी या मोर्चातून करण्यात येणार आहे.
२) शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा, सातबारा कोरा करा.
विदर्भासह संपूर्ण राज्यातील बळीराजा शेतकरी अनेक वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकटांशी झुंज देत आहेत. यंदाच्या अतिवृष्टीने तर त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे, सरकारने कोणताही विलंब न करता शेतकऱ्यांचे सर्व कर्ज सरसकट माफ करावे आणि त्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी आक्रोश मोर्चाचे माध्यमातून करण्यात येणार आहे.
३) ओला दुष्काळ जाहीर करा.

अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खरीपाची पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. निसर्गाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सर्वहारा-आदिवासी-शोषित-वंचितांच्या न्यायाची लढाई लढणारा एकमेव लढवय्या म्हणून, उभा समाज आदरणीय श्रद्धेय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघतो आहे. परमपूज्य बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी केवळ “वंचित बहुजन आघाडी” हाच एकमेव राजकीय पर्याय आणी सत्य आता आपल्या सर्वांसमोर आहे. म्हणूनच, “वंचित बहुजन आघाडी” हा सत्तेच्या राजकारणात बलशाली राजकीय पक्ष व्हावा, आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राजू निमसटकर यांनी केले आहे.