एल आयसी गोल्डन जुबली स्कॉलरशिप योजना 2025

वणी :2024-25 या शैक्षणिक वर्षात किमान 60% गुनासह/ समकक्ष ग्रेडसह 10वी किंवा 12वी डिप्लोमा उत्तीर्ण असलेल्या विधार्त्यांनसाठी, ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 4 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे. आणि असे अर्जदार जे उच शिक्षण जसे की मेडिकल, इंजिनीरिंग, कोणत्याही शाखेतील पदवी, कोणत्याही शाखेतील डिप्लोमा कोर्स / समकक्ष कोर्स, शासनमान्य इंडस्ट्रियल ट्रैनिंग इन्स्टिटयूटस / इंडस्ट्रियल ट्रैनिंग सेन्टरद्वारा प्रमाणित NCVT कोर्स. इ. करीता 2025-26 मध्ये प्रथम वर्षास प्रवेश घेतलेले अर्जदार सदर स्कॉलरशिप करीता पात्र असतील.

लाभ : 1) वैध्यकीय क्षेत्रात प्रवेश घेतल्यास रु. 40 हजार प्रतिवर्ष 2) इंजिनीरिंग क्षेत्रात प्रवेश घेत्यास रु. 30 हजार प्रतिवर्ष 3) बीए / बीकॉम / बीएसस्सी इत्यादी किवा डिप्लोमा / व्होकेशनल कोर्स साठी प्रवेश घेतल्यास रु. 20 हजार प्रतिवर्ष 4) फक्त मुलींसाठी 10+2 ( 12वी /डिप्लोमा / समकक्ष साठी रु.15 हजार प्रति वर्ष )सदर माहिती संक्षीप्त स्वरूपात दिली असून अधिक माहितीसाठी सविस्तर माहितीपत्रक पाहावे.

शिष्यवृत्ती करिता लागणारे कागदपत्रे

1. आधार कार्ड 2. बँक पासबुक 3. शिक्षवृत्ती नुसार 10 वी आणि 12 वी ची मार्कशीट 4. वर्तमानात जिथे प्रवेश आहे त्या शाळेचे ID कार्ड किंवा बोनाफाई 5. उत्पनाचा दाखला

सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर जावे

https://licindia.in/golden-jubilee-foundation

स्वयंघोषित पत्रकाराच्या दमदाटीने इसमाची आत्महत्या

णी : तालुक्यातील विरकुंड डोंगरगांव येथे एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली.सुहास हरी शिंगाने असे शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार गावातीलच वैभव गजानन पोटवडे हा इसम पत्रकार आहे असे सांगून मृतक सुहास यांना वारंवार धमकावत खंडणी मागत होता व त्याच्या सततच्या कटकटीने सुहास यांनी स्वतःची जीवन यात्रा संपविल्याचा आरोप कथित पत्रकार पोटवडे याच्यावर केला आहे.
मृतक सुहास हिंगाने हे ट्रॅक्टर च्या साहाय्याने शेतीवर आपली उपजिविका करीत होते.दरम्यान पोटवडे हा सुहास यांना धमकावत तू जर मला खंडणी दिली नाही तर तूझा रेती भरलेला ट्रॅक्टर मी पकडून तुझ्यावर शासकीय कारवाई करायला लावील.असा पाढा सतत गिरवीत होता. या संदर्भात मृतकाचा भाऊ सुभाष हिंगाने यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रारीत वैभव पोटवडे हाच माझ्या भावाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे स्पष्टपणे नमूद केले.या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण होऊन पोलिसांनी पोटवडेवर तात्काळ गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे.
या घटनेने कथित पत्रकाराच्या बेताल वागण्याने सुज्ञ पत्रकारांच्या अस्मितेवार प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ज्यांना लेखनही पकडता येत नाही तेही स्वयंघोषित पत्रकार झाले असा सूर जनमानसात उमटला आहे.

वणी पोलिसांची रेती तस्करीवर कारवाई.साडेसहा लाखाच्या मुद्देमालासह दोघे अटकेत

वणी : तालुक्यातील मुर्धोनी परिसरात ता. ८ सप्टेंबर च्या पहाटे १:५५ ते २:३० वाजेच्या दरम्यान गस्तीवर असतांना विलास रमेश आडे (वय ३० वर्ष.रा. वागधरा) आणि तुळशीराम भगवान काकडे (वय ३२ वर्ष. रा. गोकुळनगर वणी ) यांना अवैध रेती वाहतूक करतांना रंगेहात पकडले. घटना स्थळावरून पोलिसांनी लाल रंगाचा महिंद्रा युवो टेक +575 DI कंपनीचा RTO नं. नसलेला चेचीस / इंजिन क्र.006520513V01 ट्रॅक्टर आणि NKI / 2005/25 क्र. असलेली ट्राली आणि 1 ब्रॉस रेती असा एकूण ६,५६,००० (सहा लाख छप्पन हजार) रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला.आरोपीजवळ शासनाची कोणतीही परवानगी नसल्याचे तपासात आढळून आले. त्यांच्याविरुद्द भा. न्या. संहिता २०२३ चे कलम ३०३ (२), ३(५) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास वणी पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक सुदाम आसोरे हॆ करीत आहे.सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी श्री. सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वणी श्री गोपाल उंबरकर यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसोरे, पो.का. श्याम, पो.का. विकास, पो.का. वसीम यांनी केली.

आरोपी पती ५० दिवसांपासून मोकाटच

वणी : विवाहित तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी दोषी असलेला आरोपी पती गेल्या ५० दिवसापासून मोकाट असून त्याचेवर वणी पोलिस कारवाई करत नसल्याचे वणी येथील विश्राम गृहात पत्रकार परिषदेत मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले. सविस्तर वृत्त असे की,पतीच्या छळाला कंटाळून एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना ता.१९ जुलै २०२५ रोजी शहरालगत असलेल्या वणी- मुकुटबन मार्गावरील साईलीला नगरी येथे घडली होती. सदर प्रकरणात मृतक विवाहित तरुणीचे वडील किशोर करमरकर यांच्या तक्रारीवरून मयत युवतीचे पती, सासू व नणंद विरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आत्महत्येच्या घटनेल ५० दिवस उलटूनही पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या पतीला वणी पोलिसांनी अटक केली नाही.तक्रारदार वडील व कुटुंबीयांनी तीनदा उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. परंतु मुख्य आरोपी पती अद्यापही मोकाट फिरत आहे.त्यामुळे मयत आरती जयबुद्ध बुरचुंडे हिचे वडील किशोर भाऊराव करमरकर, आई रेखा करमरकर, भाऊ शुभम करमरकर, बहीण पूजा पुडके आणि जावई राहुल पुडके यांनी रविवारी ७ सप्टेंबर रोजी वणी येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन वणी पोलिसांवर निष्क्रियेताचा आरोप लावला. तसेच पीडित कुटुंब उद्या सोमवारी ८ सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन न्याय मागणार असल्याचे फिर्यादी किशोर करमरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी तिचे पती जयबूद्ध संकल्प बूरचुंडे, सासू प्रतिमा बुरचुंडे व नणंद, सर्व रा. मातोश्रीनगर, जीवक वाचनालय जवळ, वरोरा, जिल्हा चंद्रपूर विरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी सासू व नणंद यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिली.मात्र मुख्य आरोपी पती जयबूद्ध संकल्प बूरचुंडे यांनी दाखल केली अग्रिम जामीन याचिका हायकोर्टाने फेटाळली. मात्र त्यानंतरही वणी पोलिस आरोपीला अटक करण्यास टाळाटाळ करीत आहे.पोलिसांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने मृतक व कुटुंबियांना न्याय मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.माहितीनुसार आरती बुरचुंडे हिने आत्महत्या केल्यानंतर जेव्हा फिर्यादी वडील तक्रार देण्यासाठी वणी पोलीस स्टेशनमध्ये पोहचले, तेव्हा वरोरा येथील पोलीस निरीक्षक दर्जाचा एक अधिकारी व एक वकिलांनी त्यांची भेट घेऊन पोलीस तक्रार न करता परस्पर देवाण घेवाण करून प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. असा खुलासा फिर्यादी यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे महिला अत्याचार व हुंडाबळीच्या प्रकरणात दलाली करणारा तो पोलीस अधिकारी कोण ? याचाही खुलासा पोलिसांनी करावा. अशी मागणी होत आहे.

41 वर्षीय इसमाची गळफास लावून आत्महत्या

वणी : वणी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राजुर येथे एका इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.रियाज अहमद वाट्या शाह (41) असे मृतकाचे नाव आहे. शनिवारी 6 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास रियाज ने आपल्या राहत्या घरी गळफास लावला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रियाज ने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस करत आहे.

जीवनसृष्टी बहुउद्देशिय संस्था ठरतेय प्राणीमात्रा साठी जीवनदायी

वणी : पर्यावरणाचा समतोल व संवर्धनाचे रक्षण करण्यासाठी अनेकजन धडपड करित असतात. मात्र, सांघिक पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, यासाठी मारेगांव,वणी, झरी, पांढरकवडा उपविभागात गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नरत असलेले सर्पमित्र हरिष कापसे यांचे माध्यमातून हजारो विषारी, निमविषारी व बिनविषारी सापांना जीवनदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून पर्यावरणाचे संवर्धन करणारे सर्पमित्र म्हणजे हरिष कापसे. यांची टिम आज जीवनसृष्टी बहुउद्देशिय संस्थेच्या माध्यमातून संस्थेत युवक युवतीना सामिल करून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे काम युद्धपातळीवर करित आहे. आज घडीला जीवनसृष्टी बहुउद्देशिय संस्थेला दोन वर्ष पूर्ण होत असताना दि. १ सप्टेंबरला हरिष कापसे यांनी पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास पाहता जीवनसृष्टी संस्थेला मजबूत करण्यासाठी तीन प्रशिक्षित युवतीना संस्थेत स्थान दिले, प्राणीमित्र हरिष कापसे हजारो विषारी, निमविषारी,बीन विषारी सापांना जीवदान देण्याबरोबर जीवनसृष्टी संस्थेच्या माध्यमातून निलगाय, सांबर, व पक्षाना जीवदान देण्याच काम निशुल्क करित असतात, सापामध्ये बीनविषारी जाती मध्ये शेकडो प्रकार असले तरी विषारी जाती मध्येप्रमुख चार विषारी सापनाग (कोब्रा) मण्यार (कॉमनक्रेट) घोणस ( रसल वायफर फुरसे (स्वासकील्ड वायपर तर नीम विषारी साप, हरणटोळ एडिटर (भारतीय अंडी खाऊ साप) मांजऱ्या व बिनविषारी साप,धामण,कवड्या,पांदिवड, कुकरी,नानेटी,गवत्या इत्यादी आहे, या सर्व साप वर्गाचे सखोल ज्ञान हरिष कापसे यांना असून जीवनसृष्टी बहुउद्देशिय संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षित सभासदाची टिम वणी, मारेगांव, झरी, पांढरकवडा विभागात कार्यरत असून त्यामध्ये जीवनसृष्टी बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिष कापसे यांचे मार्गदर्शनात सर्पमित्र गजानन क्षीरसागर,अविनाश हीवलेकर,सुरज नथ्थुजी पारशिवे, अर्जुन राठोड, तोहीद शेख,रोहित इनामे,अनिकेत काकडे,धनराज मतिरे, घनश्याम चौधरी ,आर्यन कवाडे, जगदीश कुडलवार कार्तिक सोयल सय्यद नयनावर, मनोज मोंढे,पुजा कोवे, कु सोनु हनुमान पेंदोर, पुजा लखमा आत्राम सह जीवनसृष्टी बहुउद्देशिय संस्थेत अनेक युवक युवती सामिल होत असल्याने पर्यावरण संवर्धनासाठी संस्था महत्वाची ठरत आहे.

बसस्टॅड वणी येथे मोबाईल चोरणारे दोन चोरटे दोन तासात पोलीसांच्या ताब्यात

वणी : दिनांक 03/09/2025 रोजी बस स्टॉप वणी येथे फिर्यादी नामे राहूल कुभेकार वय 55 वर्ष रा. राजूर कॉलरी वणी आणि बजरंग विठ्ठल परबत, वय 32 वर्ष, रा. निजामपुर, ता. रिसोड, जि. वाशिम हे वणी बस स्टेंड येथून चंद्रपूर जाण्याकरीता चंद्रपूर जाणाऱ्या बसमध्ये चढत असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे खिशातील मोबाईल चोरून नेले अशा फिर्यादींच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन वणी येथे अपराध क्रमांक 597/2025 आणि अपराध क्रमांक 598/2025 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाची तकार पो.स्टे.ला प्राप्त होताच, चोरीस गेलेल्या मोबाईल व आरोपीचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून दिपक चौपाटी वणी येथे दोन संक्षयिता नामे 1) समीर साबीर पठाण वय 19 वर्ष, रा. रंगनाथ नगर वणी आणि 2) अर्जुन गोपाल आडे वय 30 वर्ष रा. रंगनाथ नगर वणी यांना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातून सदर दोन्ही गुन्हयातील चोरी गेलेला एक XIAOMI कंपनीचा काळ्या रंगाचा अॅडरॉईड मोबाईल आणि दूसरा VIVO कंपनीचा निळ्या रंगाचा अॅडरॉईड मोबाईल असे मिळून आले. सदरचे दोन्ही मोबाईल पंचासमक्ष जप्त करण्यात आले असून आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले.सदरचा गुन्हा दाखल होताच दोन तासाच्या आत सदर गुन्हयातील चोरी गेलेले दोन्ही मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, दोन मोबाईल चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सूरेश दळवे साहेब यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गोपाल उंबरकर आणि डी.वी पथकातील पो.उप.नि. धिरज गूल्हाने, पो.कॉ. मोहम्मद वसीम, मोनेश्वर खंडरे, गणेश मेश्राम, नंदकुमार पूष्पलवार, गजानन कुडमेथे सर्व पो.स्टे. वणी यांनी पार पाडली.

वणीतील कुख्यात चोर M.P.D.A. कायद्या अंर्तगत स्थानबध्द

वणी : शहरात सन २०२२ पासून वारंवार चोरी करणारा अमोल उर्फ भूऱ्या विजय ठाकरे, वय ३१ वर्ष, रा. रामनगर चिखलगाव वणी यास वारंवार चोरीच्या घटनेत अटक करण्यात आल्या नंतर तो जामीनावर सूटल्यावर परत परत चोरी करीत असल्याने, त्याचे वर वेळोवेळी प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली, तसेच मागील वर्षी त्यास मा. उपविभागीय अधिकारी वणी यांच्या आदेशाने तडीपारसूध्दा करण्यात आले होते. मात्र तडीपार आदेश संपल्यानंतर अमोल उर्फ भूऱ्या विजय ठाकरे याने वणी शहरात परत आल्यानंतर चोरी तसेच अवैध शस्त्रे बाळगून वणी शहरात दशहत निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यामूळे वणी पोलीस स्टेशनद्वारे अमोल उर्फ भूऱ्या विजय ठाकरे यास मा. जिल्हादंडाधिकारी साहेब यवतमाळ यांचे कडे त्यास M.P.D.A. कायद्या अंर्तगत स्थानबध्द करणे बाबत प्रस्ताव पाठविण्यात आला होता.त्या अनुषंगाने मा. जिल्हादंडाधिकारी यवतमाळ यांचे आदेशाने दिनांक ०४/०९/२०२५ रोजी अमोल उर्फ भूऱ्या विजय ठाकरे, वय ३१ वर्ष, रा. रामनगर चिखलगाव वणी यास स्थानबध्द करणेबाबत आदेश प्राप्त झाला असून, त्यास जिल्हा मध्यवर्ती कारागृह नागपूर, जिल्हा नागपूर येथे दाखल करण्या बाबत आदेश प्राप्त झाला आहे. त्याप्रमाणे अमोल उर्फ भूऱ्या विजय ठाकरे यास ताब्यात घेण्यात आले असून, मा. जिल्हादंडाधिकारी यांचे आदेशाने त्यास जिल्हा मध्यवर्ती कारागृह नागपूर, जिल्हा नागपूर येथे दाखल करण्याची प्रकीया सूरू आहे.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक कुमार चिंता साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरेश दळवे साहेब यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गोपाल उंबरकर आणि डी.बी पथकातील पो.उप.नि. धिरज गुल्हाने, पो.कॉ. मोहम्मद वसीम, मोनेश्वर खंडरे, गणेश मेश्राम, नंदकुमार पूप्पलवार, गजानन कुडमेथे सर्व पो.स्टे. वणी यांनी पार पाडली.

नशिब बलवत्तर म्हणून एक “झाड ” हाताला लागले आणि तेच त्याच्यासाठी जीवनदाता ठरले.

वणी : ‘काळ आला होता, पण वेळ नाही’ या वाक्प्रचाराचा प्रत्यय देणारी घटना मागील दोन तीन दिवसा आधी वणी येथील सतिघाट पुलावर घडली होती. त्यावेळी निर्गुडा नदीचे पाणी पुलावरून वाहत असताना पूल पार करण्याच्या प्रयत्नात एक 60 वर्षीय इसम पुराच्या प्रवाहासोबत वाहून गेला होता. पण नशिब बलवत्तर म्हणून एक झाड हाताला लागले आणि तेच त्याच्यासाठी जीवनदाता ठरले. अखेर घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारला सकाळी रेक्यु करुन त्याला पुरातून बाहेर काढण्यात नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता.1) रात्री सुकनेगाव येथिल कवडू पुसाम हा इसम आपल्या गावी येण्यासाठी निघाला होता. परंतु निर्गुडा नदिच्या सतिघाट पुलावरून पाणी होते. हळूहळू पुढे सरकत त्याने पूल पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवाहाच्या वेगाने तो घसरून पाण्यात पडला. नंतर सावरणे कठीण झाल्याने तो पाण्यासोबत वाहून जाऊ लागला. काही अंतरावर नदीपात्रातील एक झाड त्याच्या हाती लागले. प्रसंगावधान राखत त्याने रात्रभर झाडाला घट्ट पकडून ठेवले. सकाळी त्याला नगर पालिकेचे कर्मचारी कुंदन तोमस्कर आणि सुरेश तंबोली यांनी रेक्यु करुन तब्बल आठ नऊ तासांनंतर कवडू ला बाहेर काढण्यात यश आले. सध्या वणी परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे पावसामुळे नदी नाल्यांना पुर आलेला असताना नागरिकांनी पुराच्या पाण्यातून जिव धोक्यात घालून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक संपन्न

वणी : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी काँग्रेसची सोमवारी दिनांक 1 सप्टेंबर रोजी वसंत जिनिंग हॉल, वणी येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या आगामी रणनीतीवर सखोल चर्चा झाली. चर्चेअंती भविष्यात जोमाने आणि एकजुटीने निवडणूक लढण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. बैठकीला पक्षातील वणी विधानसभेतील ज्येष्ठ नेते, विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व खा. प्रतिभा धानोरकर यांच्या आदेशाने व काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात ही बैठक पार पडली. नरेंद्र ठाकरे उपाध्यक्ष जि प यवतमाळ हे बैठकीचे अध्यक्ष होते. बैठकीत निवडणूक रणनीती, जनसंपर्क आणि स्थानिक समस्यांवरील उपाययोजना यावर चर्चा झाली. पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी ठोस योजना आखण्यात आल्या. पक्षात युवा कार्यकर्त्यांचा सहभाग आणि ग्रामीण भागातील मतदारांशी संवाद वाढवण्यावर भर देण्यात आला.

समन्वयाने काम केल्यास काँग्रेसचा झेंडा फडकणार – संजय खाडे

कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून मतदारांचा विश्वास संपादन करावा. राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे थेट सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत असून ते शेतकरी, मजूर आणि युवकांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या याच धडाडी आणि समर्पणाच्या मार्गावर पक्षाने चालायला हवे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यामुळे पक्षाला नवीन उर्जा मिळाली आहे. सर्वांनी समन्वयाने काम केल्यास जिल्हा परिषद, नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार.

संजय खाडे, प्रदेश सचिव

काँग्रेसनरेंद्र ठाकरे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषणात जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला. पुरुषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर, शंकरराव व-हाटे, तेजराज बोढे, वसंतराव आसुटकर, विकेश पानघाटे, सुरेश रायपुरे, ओम ठाकूर, सुनील वरारकर, प्रमोद लोणारे, राकेश खुराना, पुंडलिक गुंजेकार, प्रेमनाथ मंगाम, प्रफुल्ल उपरे, अशोक चिकटे, प्रभाकर मधुकर मुळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करीत पक्ष संघटना वाढीबाबत मत मांडले. बैठकीत आगामी काळात गावोगावी जनसंपर्क मोहिम राबवणे, मतदारांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणे. तसेच, युवा आणि महिला सेल्सना विशेष जबाबदारी देण्याबाबत चर्चा झाली. कार्यक्रमाचे संचालन अनंत डुंभारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजू अंकीतवार यांनी मानले. या बैठकीमुळे वणीतील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना निर्माण झाली आहे.