वाहतूक विभागाला बॅरिकेट्स भेट- श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेचा उपक्रम

वणी : वणी परिसरातील वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. विविध ठिकाणी रस्त्याचे काम असते. यामुळे परिसरात अनेकदा वाहतुकीची समस्या निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या अध्यक्षा संगिता खाडे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय खाडे यांच्या माध्यमातून वणी वाहतूक उपशाखेला 10 बॅरिकेट्स भेट देण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास रस्ते बंद करणे, सण उत्सवाच्या वेळी वाहतूक वळवणे, प्रगतीपथावर असलेले क्षेत्र दर्शवणे, अपघातांचा धोका कमी करणे, वाहनांना सुरक्षितपणे मार्ग दाखवणे इत्यादी साठी बॅरिकेट्सची गरज भासते. वणी वाहतूक उपशाखेकडे बॅरिकेट्सची कमतरता लक्षात घेऊन संगिता खाडे यांच्या माध्यमातून 10 बॅरिकेट्स भेट देण्यात आले. मंगळवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी एका छोटेखानी कार्यक्रमात हे बॅरिकेट्स वाहतूक शाखेकडे वितरीत करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात यांनी पतसंस्थेचे आभार मानले. कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, ठाणेदार गोपाळ उंबरकर, पोलीस उपनिरीक्षक वाहतूक विभाग विजय महाले यांच्यासह पुरुषोत्तम आवारी, प्रकाश धवळे, संदीप कांबळे, वैभव डंभारे, गणेश लडके, तेजराज बोढे, कविता चटकी, वंदना धगडी, शारदा ठाकरे, निशा गौरकार, सुनिता बोढे, चेतन मांडवकर, अनुराग आयतवार, सचिन ढवस, कैलास खिरटकर यांच्यासह वाहतूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

वणी शहरात रेसिंग करणाऱ्या दुचाकी चालकांवर पोलिसांची कारवाई; पालकांनाही इशारा

वणी : शहरात काही युवक मुख्य रस्त्यांवर रेसिंग बाईक चालवून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत असल्याची तक्रारी मोटर साईकल क्रमांका सह वणी पोलिसांना प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शहरात गस्त वाढवली होती.दिनांक ३१ ऑगस्ट, २०२५ रोजी सायंकाळी गस्तीदरम्यान, पोलिसांनी जैन ले-आऊट परिसरात प्राप्त तक्रारीतील MH 29CL1790 आणि MH29CG8758 क्रमांकाच्या दोन रेसिंग बाईक व चालक अनुक्रमे सतीश रामदास हिवरकर आणि सुखदेव सुनील भोयर (दोघेही रा. गणेशपूर/छोरिया ले-आऊट, वणी) यांना ताब्यात घेतले.पोलिसांनी विचारपूस केली असता, त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) किंवा इतर आवश्यक कागदपत्रे आढळून आले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली.वाहतूक शाखेमार्फत दंड:• MH29CL1790: 12,750 रुपये दंड• MH29CG8758: 2,750 रुपये दंडवणी पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, शहरात किंवा परिसरात कोणीही रेसिंग (RASH DRIVING) करू नये. तसेच, पालकांनी आपल्या मुलांना रेसिंगसाठी वाहने देऊ नयेत. अन्यथा, कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कायद्याचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वणी पोलिसांनी केले आहे.

श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती मंदिरात चोरडीया परिवारातर्फे अन्नदान

वणी : श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टमध्ये दान दात्यांकडुन अखंडित अन्नदान सेवा सुरू आहे. वणी येथील दानशूर व्यक्तीमत्व विजयबाबु चोरडीया यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही अन्न दान करण्यात आले. रांजणगाव हे पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध गणपती मंदिर आहे हजारो गणेश भक्त या मंदिरात दर्शनासाठी येतात. अन्नछत्राची वेळ दररोज दुपारी १२ ते २ व रात्री ७:३० ते ९ अशी आहे. दिनांक ३० ऑगस्ट ला ऍड. कुणाल विजयबाबु चोरडीया यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले. यावेळी महाप्रसादाचा शेकडो भक्तांनी लाभ घेतला.विशेष म्हणजे गणेशोत्सवादरम्यान रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टमध्ये महाप्रसादाची अखंड १७ वर्षांपासून ही परंपरा वडील विजय बाबू आणि मुलगा ऍड.कुणाल चोरडिया हे दोघेही दरवर्षी पुढे चालवत आहेत.यावर्षी कु. काजोल विजय चोरडिया, सौरभ राजुरकर, प्रतिक मेहता, पार्थ त्रिवेदी, अँड रुषभ शर्मा, तृन्मयी खाडे, कुणाल सुत्रावे , प्रमोद उरकुडे, संगीता संचोती , हर्शला बिंदेल, शिवम बिंदेल, कौस्तुभ देशपांडे, वेदिका बिंदेल यांनी सहकार्य केले.

प्रवीण खानझोडे यांचा शिवसेना (उबाठा) गटाला “जय महाराष्ट्र”

वणी : शिवसेनेचे प्रवीण खानझोडे यांनी सोमवारी शिवसेना (उबाठा) ला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोडांवर असताना प्रवीण खानझोडे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने उबाठा गटाला धक्का बसला आहे. सर्व पक्षीय एकीकडे आपल्या पक्षाची ताकत वाढवत, मोर्चे बांधणी सुरु केली असताना दुसरीकडे पक्षाला धक्का देण्याची बातमी समोर आली आहे. बहुजन चळवळीतील कॅडरबेस कार्यकर्ता तथा उबाठा गटाचे प्रवीण खानझोडे यांनी शिवसेनेला “जय महाराष्ट्र” केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात असून विविध चर्चेला उधाण आले आहे.

ह्या कारणास्तव शिवसेनाला “जय महाराष्ट्र”

मागील काही वर्षांपासून ते पक्षात कार्यरत होते. परंतु त्यांच्या काही खाजगी कामामुळे खानझोडे ह्यांना पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे त्यांनी स्वतः पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय आज रोजी घेतला आहे. त्यांनी सांगितले की, पक्षाचा व संघटनात्मक माझा कुठलाही संबंध नाही. शिवसेना पक्षातील सर्व नेते व मित्रपरिवार व सहकारी हे मला जाणते आहे व त्याच्या सोबत आज रोजी माझे आपुलकीचे व स्नेहाचे संबंध आहे व राहतील. पुढे असंही म्हटल की, आज पासून शिवसेना (उबाठा) गटाशी माझा कुठलाही राजकीय संबंध नाही, असं स्पष्ट सांगितले असून त्यांच्या अशा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेरचा”जय महाराष्ट्र” त्यांनी घेतला. अशी माहिती खुद प्रवीण खानझोडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या संदेशात म्हटलं आहे.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

वणी: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस वणीत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालय वणी येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. हर्षवर्धन सपकाळ यांचे नेतृत्व आम्हाला केवळ राजकारणासाठी नव्हे, तर जनसेवेसाठी झटण्याची प्रेरणा देते. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस आमच्यासाठी नव्या प्रेरणेचा सोहळा आहे. असे प्रतिपादन यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी केले.संजय खाडे पुढे म्हणाले की हर्षवर्धन सपकाळ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्र काँग्रेस जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देत आहे. त्यांचा हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्ष वणी विधानसभा क्षेत्रात वाटचाल करीत आहे. स्थानिक पातळीवर जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच आघाडीवर राहिला आहे. राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसून ते लोकसेवेचे माध्यम आहे, हा त्यांचा विचार आम्हाला सतत प्रेरणा देतो. त्यामुळे काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी सदैव लोक कल्याणाकरता झटतात. असे ही ते म्हणाले ग्रामीण रुग्णालयात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. कार्यक्रमाला डॉ. शंकर वऱ्हाटे, प्रमोद लोणारे, ओम ठाकूर, पुरुषोत्तम आवारी, प्रशांत गोहोकार, राजू अंकितवार, अशोक चिकटे, ज्ञानेश्वर बोनगीरवार, ईश्वर खाडे, धनंजय खाडे, प्रशांत गोहकर, उत्तम गेडाम, तेजराज बोढे, विकेश पानघाटे, जितू बोंडे, प्रफुल्ल उपरे, संदीप ढेंगळे, हर्षल नरपांडे, महादेव दोडके आदी काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवासेनेच्या निवेदनाची घेतली तात्काळ दखल

वणी : महावितरण उपविभागीय कार्यालयाचे तिसऱ्या मजल्यावर स्थलांतर झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत होता. लिफ्ट बंद असल्याने वृद्ध, महिला, शेतकरी व ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांना कार्यालयात पोहोचणे ही मोठी समस्या निर्माण झाली होती.या गंभीर प्रश्नावर युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी कार्यकारी अभियंता महावितरण यांना निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. अन्यथा महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला होता.युवासेनेच्या निवेदनाची प्रशासनाने तात्काळ दखल घेतली असून नागरिकांच्या सोयीसाठी लवकरच आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी युवासेना नेहमीच कटिबद्ध राहील, असा विश्वास अजिंक्य शेंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

वणीत भर दिवसा थार वाहणाची तोडफोड

वणी : वणी येथे भर दिवसा एका थार वाहणाची तोडफोड करण्यात आली. ही धक्कादायक घटना शनिवारी दुपार च्या सुमारास टिळक चौकात घडली असून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले. शहरातील मुख्य मार्ग असलेल्या टिळक चौकात एका तरुणाने चक्क! उभी असलेली थार कारची तोडफोड करून नुकसान केले. मात्र,पोलीस तपासातून तो तरुण मनोरुग्ण असल्याचे माहिती समोर आली. आज शनिवारी नागपूर येथील अभिषेक राजू ठोबळे हे न्यायालयीन कामासाठी आले असता टिळक चौक येथे त्यांनी कार उभी करून ठेवली होती. अशातच उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडत करत असताना ये-जा करणाऱ्या नागरिकांनी थरार अनुभवला. या दरम्यान भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या तरुणाला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस तपासात तो तरुण मनोरुग्ण असल्याचे समोर आले. मात्र, अशा घटना पुन्हा घडू नये,यासाठी प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा शहरवासियांकडून व्यक्त होत आहे.

कायर प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था

वणी: तालुक्यातील कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती अत्यंत बिकट झाली असून, आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची कमतरता, वैद्यकीय उपकरणांचा आणि औषधांचा अभाव यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी याबाबत तालुका आरोग्य अधिकारी, वणी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कायर प्राथमिक आरोग्य केंद्रातील दुरवस्थेमुळे परिसरातील नागरिकांना उपचारासाठी वणी किंवा इतर ठिकाणी जावे लागते. यात त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. अनेकदा गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो.या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत, अशी मागणी मनसेने केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्यात यावीत, आवश्यक औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचा पुरेसा पुरवठा करण्यात यावा आणि केंद्राची आरोग्य व्यवस्था पूर्ववत करण्यात यावी, असे निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.यावेळी निवेदन देताना राकेश शंकावार, विनोद कुचणकर, कैलास निखाडे, आशिष ठावरी, चेतन कुचणकर, अतुल काकडे, सागर बोथले, प्रवीण कळसकर, अंनता आगलावे, संदीप गुरनुले, अजय शेंडे, प्रीतम बदकल, प्रदीप वाढई, सतीश मोहितकार, सारंग बोथले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने यावर तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.

58.75 कोटी रुपये खड्ड्यात

वणी : वणी -मुकुटबन राज्य मार्गावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात आदळून अनेक अपघात होत आहेत. वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन जायचे तरी कसे? असा सवाल प्रवासी व नागरिकांनी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला केला आहे.

वणी – कायर, पुरड हा राज्य मार्ग 23.50 किलोमीटर लांबीचा, या रस्त्याचे काम 2018-19 पासून भारत सरकारच्या केंद्रीय सडक निधी परियोजना माध्यमातून सुरु करण्यात आले आणि दोन ते तीन वर्षांपूर्वी पूर्ण झाले. मात्र, या मार्गाच्या कामाच्या दर्जाच्या बाबत अनेकांनी प्रश्न निर्माण केला आहे. शासनाकडून सुमारे रु.5875.00 लक्ष रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या मार्गाच्या दुरावस्थेमुळे प्रवासी व नागरिक संतप्त आहेत. या मार्गावरील खड्डे योग्य प्रकारे भरण्यासाठी स्थानिकांनी मागील दोन वर्षांपासून निवेदने केली. खड्ड्यामंध्ये झाडे लावून आंदोलनही करण्यात आले. मात्र, अजुनपर्यंत कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी मानकी शिवारातील वाघदोडा पुलाजवळ खड्ड्यात तिन चाकी ऑटो पलटी होऊन एक तरुण गंभीर जखमी झाला होता. तर असे अपघात या मार्गावरील खड्ड्यांमुळे नित्याचेच झाले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) अजून किती अपघातांची वाट बघणार आहे.

वणी- कायर मार्गावर मानकी गावापर्यंत चार किलोमीटर अंतरावर जागोजागी खड्डे पडले आहेत त्यामुळे अनेक अपघात घडत आहे खड्ड्यांमुळे अपघात होऊन जिवीतहानी होण्याअगोदर या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून खड्डे चांगल्या प्रकारे भरण्यात यावेत. अन्यथा जनआंदोलन केले जाईल.

गुरुदेव चिडे, सामाजिक कार्यकर्ते

राजूर येथील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करा

वणी : तालुक्यातील राजूर कॉलनी परिसरात सुरू असलेल्या वरली मटका आणि इतर अवैध धंद्यांमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी वणी पोलिसांना दोन दिवसांत कठोर कारवाई करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

‘राजकीय’ आणि ‘पत्रकारिते’च्या नावाखाली चालतात धंदे

राजूर कॉलनी ही वणीची एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे चिंतेचा विषय बनले आहेत. या धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. यातून परिसरात अशांतता निर्माण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील अनेक अवैध धंदे चालक पत्रकारिता आणि राजकीय पदांचा वापर करून पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

मनसे आक्रमक, दोन दिवसांचा अल्टिमेटम

या गंभीर परिस्थितीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वणी पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले आहे. फाल्गुन गोहोकार यांनी निवेदनात म्हटले आहे की, “या अवैध धंद्यांमुळे परिसराची शांतता आणि सुव्यवस्था बिघडली आहे. पोलीस प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष घालून पुढील दोन दिवसांच्या आत कठोर आणि निर्णायक कारवाई करावी.”जर यावर ठोस पाऊले उचलली नाहीत, तर राजूरचे सामाजिक सलोखा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मनसे शांत बसणार नाही. यानंतर आपल्या कार्यकर्त्यांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.पोलीस या निवेदनाची दखल घेऊन अवैध धंद्यांवर काय कारवाई करतात, याकडे राजूरमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे. निवेदन देतेवेळी शंकर बोरगलवार, सोमेश्वर ढवस, उमेश नवले, प्रवीण दुमोरे,मयुर घाटोळे, भोला चिकणकर, लकी उपरे, सूरज काकडे, धीरज बगवा, उमेश सातपुते, अमोल पारखी, मारोती सातपुते, बाळू सोनटक्के, अमोल राजुरकर यांच्यासह अन्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.