शारदा महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी संगीता खाडे

वणी : धनोजे कुणबी महिला विकास संस्था अंतर्गत शारदा महोत्सव समितीच्या निवडीची मंगळवारी दिनांक 19 ऑगस्ट रोजी बैठक झाली. या बैठकीत अध्यक्ष म्हणून संगीता खाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या सोहळ्याच्या उपाध्यक्षपदी स्मिता नांदेकर आणि सचिवपदी सविता गौरकार यांचीही निवड झाली. शारदा उत्सव समितीच्या माजी अध्यक्षा लताताई वासेकर यांनी संगीता खाडे यांच्याकडे अध्यक्षपदाचा पदभार सोपवला.

या प्रसंगी धनोजे कुणबी महिला विकास संस्थेच्या सल्लागार किरण देरकर, अध्यक्ष साधना गोहोकार, उपाध्यक्ष वंदना आवारी, सचिव अर्चना बोदाडकर, संचालिका मीनाक्षी देरकर, साधना मत्ते, कविता चटकी, शारदा ठाकरे, कविता कातकडे, संध्या बोबडे वनिता काकडे इत्यादी सदस्य महिला उपस्थित होत्या. मला मिळालेल्या या जबाबदारीचा मला अभिमान आहे. सर्व समाज सखींना सोबत घेऊन, एकत्रितपणे काम करून शारदा महोत्सवाला आणखी उंचीवर नेऊ. असा मानस संगीता खाडे यांनी व्यक्त केला. त्यांच्या निवडीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

महात्मा फुले अभ्यासिकेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात

दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी संजय खाडे यांच्या पुढाकारातून संजय खाडे फाउंडेशन द्वारा वणीत एक अद्यावत अभ्यासिका सुरु करण्यात आली. आज या अभ्यासिकेत 180 विद्यार्थी नियमीत अभ्यास करीत आहे. अभ्यासिकेने यशस्वीरित्या एक वर्ष पूर्ण केल्यामुळे सोमवारी दिनांक 18 ऑगस्ट रोजी प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या अभ्यासिकेत 1 वर्षात 9 विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेत. सोहळ्यात या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात संजय खाडे यांनी विद्यार्थ्यांच्या कायम पाठिशी उभे राहणार असे वचन दिले.

दर्जेदार शिक्षण देणे हाच संकल्प –संजय खाडे

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुणे किंवा मुंबईसारख्या शहरात जाऊन शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. हे टाळण्यासाठी मी यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात प्रथमच अद्यावत अभ्यासिका केंद्र सुरू केले. या अभ्यासिकेतून ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे. ते येथूनच मोठ्या पदांवर कार्यरत होऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे, हा माझा संकल्प आहे. जर विद्यार्थ्यांना अभ्यासादरम्यान कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत असेल, त्यांच्या अडचणी मला कळवाव्या, मी त्या नक्कीच सोडवेन!

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पीएसआय विजय महाले म्हणाले की विद्यार्थ्यांनी स्वत: मधली क्षमता ओळवावी व त्या नुसार स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. संयमाने व परीश्रमपूर्वक प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळते. असा कानमंत्र त्यांनी दिला. प्रा. वैभव ठाकरे यांनी अभ्यासिका सुरु करण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की वणी येथे अद्ययावत अभ्यासिका सुरू व्हावी यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र यश येत नव्हते. अखेर संजय खाडे यांच्यासोबत या विषयावर चर्चा केली असता त्यांनी हा प्रश्न तातडीने सोडवला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी कु. श्वेता दोडके यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सूरज जूनगरी यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांच्या स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

आदिवासी विशेष पदभरतीसाठी यवतमाळात हजारोंचा मोर्चा

यवतमाळ : आदिवासी समाजातील न्याय्य युवकांच्या रोजगाराच्या हक्कासाठी सोमवारी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने आदिवासी विद्यार्थी सहभागी झाले.६ जुलै २०१७ रोजी जगदीश बहिरा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले होते की, आदिवासी विशेष पदभरतीतील अधिसंख्य १२,५२० पदे तसेच रिक्त ८५,००० पदांची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने तातडीने करावी. परंतु अद्यापही शासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नसल्यामुळे आदिवासी समाजात प्रचंड नाराजी आहे. मोर्चात सहभागी नेत्यांनी जाहीर केले की – शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण आदी विभागातील हजारो पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत. या रिक्त पदांवर आदिवासी युवकांची नियुक्ती न झाल्यास शासनाविरोधात राज्यव्यापी उग्र आंदोलन छेडले जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात घोषणाबाजी, निषेधफलक आणि मागण्यांचा वर्षाव करण्यात आला. मोर्चादरम्यान नेत्यांनी भाषणातून शासनाच्या विलंबशाहीवर टीका केली आणि “आदिवासी युवकांना न्याय मिळालाच पाहिजे” असा ठाम निर्धार व्यक्त केला. मोर्चेकऱ्यांनी आपले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे सुपूर्द केले. शासनाने जर तातडीने निर्णय घेतला नाही, तर पुढील काळात आदिवासी समाजाच्या आंदोलनाला रोखणे कठीण होईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.

बचतगटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगाराची संधी – उप मुख्याधिकारी जयंत सोनटक्के

वणी नगर परिषदेच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्र नुकतेच शिवाजी उद्यान जवळील वॉटर सप्लाय येथिल बगीच्यात स्थापन करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून वणी शहारातील गरीब लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावणे व त्यांना उपजीविकेची शाश्वत संधी उपलब्ध करून देण्यासाठी शहरात दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील गरीब उत्पादक व ग्राहक यांची सांगड घालणे व शहरी गरिबांना माहिती आणि व्यवसायासाठी आवश्यक ते सहाय्य करणे या उद्देशाने सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्राची स्थापना करण्यात आली.

नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे आणि उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात स्थापना करण्यात आलेल्या या शहर उपजीविका केंद्राची पाहणी मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली त्यावेळी
मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांनी बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची पाहणी करून असे दर्जेदार उत्पादन केल्याबद्दल महिलांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी घेण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांनी उपस्थित महिला जन समुदायाला संबोधित करतांना म्हणाले की, महिला ह्या कुटुंबाचा मुख्य धागा आहेत. महिलांची चिकाटी आणि काम करण्याची सचोटी, जिद्द आणि कष्ट करण्याची क्षमता ही फार मोठी असते असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्राला शुभेच्छा देवून त्यांनी महिलांच्या या संघटनेचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तत्पूर्वी उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांनी आपल्या प्रास्ताविकात सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्र स्थापनेच्या कार्यात आलेल्या शासकीय आणि प्रशासकीय अडचणींचा उहापोह केला. सर्व प्रकारच्या अडचणी त्यांची कशा दूर केल्या आणि या उपजीविका केंद्राची स्थापना कशी झाली, त्याचे उद्देश काय, भविष्यात केंद्राची वाटचाल कशी राहील इत्यादी विषयांवर यांनी आपले विचार प्रस्ताविकामधून मांडले. क्रांतीज्योती शहर स्तर संघाच्या अध्यक्षा वनिता खंडाळकर यांनी शहर स्तर संघाची वाटचाल आणि सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्राची स्थापना करतांना आलेली आव्हाने यावर आपले मनोगत व्यक्त केले. सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्राची पुढील वाटचाल कशी राहील यावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर उप मुख्याधिकारी जयंत सोनटक्के, मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार, दैनिक हिंदुस्थान वृत्तपत्राचे प्रतिनिधी व मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य परशुराम पोटे, बचत गटाचे अध्यक्ष अनुज मुकेवार, यांच्यासह संदिप बेसरकर, ज्ञानेश्वर बोनगीनवार, अमोल कुमरे, महादेव दोडके, संजय चिंचोलकर उपस्थित होते.

विभाग प्रमुख अॅड. पौर्णिमा शिरभाते यांच्या अथक परिश्रमातून उभारण्यात आलेल्या तसेच बचत गटाच्या माध्यमातून स्थापना करण्यात आलेल्या या सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्राची पाहिजे तशी माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही त्यामुळे या केंद्राची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध वृत्तपत्रे, न्यूज पोर्टल च्या माध्यमातून प्रयत्न कण्यात येईल असे आश्वासन परशुराम पोटे यांनी या प्रसंगी दिले.

शहर उपजीविका केंद्रात घेण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्र संचालन विभाग प्रमुख अॅड. पौर्णिमा शिरभाते यांनी केले तर उत्तम हापसे, शहर अभियान व्यवस्थापक यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रांतीज्योती शहर स्तर संघाच्या अध्यक्षा वनिता खंडाळकर, सोनाली तिवारी, रुणाली मस्के, दुर्गा विरुळरकर, मनजित कौर, प्रिया मेश्राम,रमा नयनवार, वर्षा लाकडे, वंदना काकडे, शामली सहारे,शारदा दोरखंडे,तृप्ती माळीकर, किरण शिरनाथ, रंजना भांडारवार, छाया जांभूळकर, ममता मेंगावार व सर्व वस्ती स्तर संघ आणि शहर स्तर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

कीटकनाशक प्राशन करून वेगावच्या युवकाची आत्महत्या

तालुक्यातील वेगाव येथे युवकाने कीटनाशक प्राशन करून मृत्यूला कावटाळल्याची घटना ता.16 ला संध्याकाळी 6 वाजेदरम्यान घडली. राहुल शंकर मेश्राम (23) आहे.
सविस्तर बातमी अशी की राहुल हा रोजमजुरी करून उदरनिर्वाह करत होता त्याने स्वतःच्या घरीच कीटक नाशक प्राशण केले ही बाब कुटूंबीयांच्या लक्षात येताच राहुलला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल केले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने इतरत्र नेण्याचा सल्ला दिला.मात्र वाटेतच त्याचा श्वास बंद झाल्यामुळे त्याला परत मारेगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता तपासाअंती डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुसऱ्या दिवशी 17 ऑगस्ट ला शवविच्छेदन करून वेगांव येथील श्मशान भूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे